रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा, लांज्यात मासे पकडायला गेलेला बुडून बेपत्ता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी, रत्नागिरी

मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपणे सुरुच ठेवले आहे. बुधवारी मध्यरात्री धोधो कोसळणाऱ्या पावसाचा आज पुन्हा पहाटे जोर वाढला. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झाले असून मोठ्या प्रमाणात पाणी साठले आहे. पुढील ४८ तासात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. लांजा तालुक्यात मासे पकडण्यासाठी लघुपाटबंधाऱ्यात गेला असता एकजण बुडून बेपत्ता झाला आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद दापोली तालुक्यात झाली. दापोली तालुक्यात २१८ मिमी पाऊस पडला. दापोली तालुक्यातील मासेगुजर आणिे हर्णे येथील रस्ते पाणी भरल्यामुळे काही तास बंद होते. तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ९३.८९ मिमी पाऊस पडला. त्यामध्ये मंडणगड ४७ मिमी, खेड ५५ मिमी, गुहागर ४० मिमी, चिपळूण २३ मिमी, संगमेश्वर ५२ मिमी, रत्नागिरी १६८ मिमी, लांजा १४० मिमी, राजापूर तालुक्यात १०२ मिमी इतका पाऊस पडला. दापोली तालुक्यातील हर्णे येथील हजीज अकबर यांच्या घराचे पावसामुळे ५ हजार रुपयांचे, कोळसरे येथील विलास पांडूरंग महाडिक यांच्या घराचे १२ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. लांजा तालुक्यातील वाडगाव येथील गजेंद्र सदाशिव गोसावी हे बोर्डेवाडी येथे लघुपाटबंधारऱ्यात मासे पकडण्यासाठी गेले असता बेपत्ता झाले आहेत. ते पाटबंधाऱ्यातील गाळामध्ये अडकले असण्याची शक्यता तालुका नियंत्रण कक्षाकडून व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत पाटंधारे विभाग रत्नागिरी घटनास्थळी रवाना झाले असून तालुका नियंत्रण कक्षातील संबंधित अधिकारी व कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

पुढील ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा
कुलाबा वेधशाळेकडून आलेल्या संदेशानुसार पुढील ४८ तासांत रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी असे आवाहन रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.