
दोन हजार रुपयांची नोट वितरणातून मागे घेण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. मात्र, आधीच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे राज्यातील आणि देशभरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या नोटा अद्यापि बदलून मिळालेल्या नाहीत. राज्यातील नऊ आणि अन्य काही राज्यांतील अशा जिल्हा बँकांमध्ये जुन्या 500 आणि 1000च्या 112 कोटी रुपये मूल्याच्या नोटा अद्यापि पडून आहेत. रिझर्व्ह बँकेने या नोटा बदलून दिलेल्या नाहीत. त्यामुळे आता दोन हजारांच्या नोटा कशा जमा करणार? असा पेच जिल्हा बँकांपुढे आहे.
केंद्र शासनाने 8 नोव्हेंबर 2016 रोजी 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या. दुस ऱ्या दिवशी देशभरातील सर्व बँका बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. 10 नोव्हेंबरपासून बँकांचे कामकाज सुरू झाले तेव्हा बँकांना 500 व 1000 रुपयांचा नोटा स्वीकारण्यास मान्यता देण्यात आली, तर चार दिवसांनी म्हणजे 14 नोव्हेंबर रोजी बँकांना 500 व 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास मनाई करण्यात आली.
मधल्या कालावधीत म्हणजे 10 ते 13 नोव्हेंबर या चार दिवसांत बँकांकडे 500 व 1000च्या नोटा मोठय़ा प्रमाणात जमा झाल्या होत्या. राज्यातील सर्व जिल्हा बँकांकडे मिळून अशा 2771 कोटी रुपयांच्या नोटा जमा झाल्या.
तथापि, यामध्ये बँकांकडे 8 नोव्हेंबरपूर्वी असलेल्या नोटांबाबतचा निर्णय प्रलंबित राहिला. याप्रमाणे कोल्हापुरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने 254 कोटी रुपये भरले; पण अद्यापि 25 कोटींचा निर्णय झालेला नाही. सांगली जिल्हा बँकेने 301 कोटी रुपये भरले; पण 14 कोटी 72 लाख रुपयांची रक्कम स्वीकारलेली नाही. नाशिक जिल्हा बँकेचे 371 कोटी जमा झाले तरी अजून 21 कोटी रुपयांबाबत निर्णय झालेला नाही. याचप्रमाणे पुणे, नागपूर, वर्धा, अमरावती, नगर आदी जिह्यांतील बँका, तसेच गुजरात, तामीळनाडू आदी राज्यांतील 67 जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या रकमा मोठय़ा प्रमाणात पडून आहेत. राज्यात नऊ बँकांच्या 111 कोटी 18 लाख रुपयांच्या नोटा अजूनही रिझर्व्ह बँकेने बदलून दिलेल्या नाहीत. दरवर्षी त्यावरील व्याज लक्षात घेता, सुमारे 12 कोटी रुपयांचा भुर्दंड जिल्हा बँकांना आणि पर्यायाने शेतक ऱ्यांना बसत आहे.
























































