ग्रॅण्ट रोडमध्ये सहा मजली इमारतीत आग, आगीत होरपळून वृद्धेचा मृत्यू

27

सामना ऑनलाईन,मुंबई

ग्रॅण्ड रोडमधील ऑगस्ट क्रांती मैदानाच्या जवळ असलेल्या एका सहा मजली इमारतीत आज पहाटे लागलेल्या आगीत एका 70 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. नर्गीस कांगा असे या वृद्ध महिलेचे नाव असून ती घरात एकटीच राहत होती.

ऑगस्ट क्रांती मार्गावर निर्मल निवास ही इमारत असून आज पहाटे 4 वाजता या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग लागली. काही वेळातच अग्निशमन दलाच्या चार गाडय़ा घटनास्थळी रवाना झाल्या. पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी 9 वाजता ही आग विझली.

पहाटेच्या वेळी आग लागल्यामुळे शेजाऱ्यांना जळल्याचा वास आल्यानंतरच आग लागल्याबद्दल कळले. मात्र तोपर्यंत आगीने संपूर्ण घराचा ताबा घेतला होता. आगीत घरातील कपडे, पडदे, पुस्तके जळून खाक झाली. या आगीत नर्गीस या 90 टक्के भाजल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना नायर रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या