2 दिवसांसाठी गाडी चालवायला न दिल्याने महिलेचा खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, ठाणे

मीरारोडमध्ये राहणाऱ्या रीटा रॉड्रीग्ज यांच्या खून प्रकरणाचा ठाणे पोलिसांनी छडा लावला आहे. ज्या आरोपीला अटक करण्यात आली त्याने खुनामागचं कारण ऐकून पोलीसही अवाक झाले आहेत. रीटा यांनी दोन दिवसांसाठी गाडी चालवायला देण्यास नकार दिल्याने त्यांचा खून करण्यात आल्याचं आरोपीने सांगितलं आहे.

ठाणे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने संजय उर्फ सोनू वर्मा (वय-३४ वर्ष) नावाच्या आरोपीला कानपूरमधून अटक केली आहे. संजय वर्मा हा रेल्वेच्या गाड्यांचं दुरुस्ती काम करणारा खासगी कंत्राटदार आहे. रीटा रॉड्रीग्ज यांच्या मालकीच्या कारची तो सतत मागणी करत होता. दोन दिवस आपल्याला गाडी हवी आहे असं म्हणत त्याने रीटा यांच्यामागे तगादा लावला होता. मात्र रीटा यांनी त्याला गाडीची चावी देण्यास सातत्याने नकार दिला होता. यामुळे भडकलेल्या संजय वर्माने ४ तारखेला दिवाळीची मिठाई देण्याच्या बहाण्याने रीटा यांच्या घरात प्रवेश केला आणि चाकून भोसकून त्यांचा खून केला.

ज्या दिवशी रीटा यांचा खून झाला त्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासलं होतं. या दृश्यांमध्ये संजय वर्मा हा संशयास्पद अवस्थेत रीटा यांच्या इमारतीबाहेर घुटमळत असल्याचं दिसलं होतं. खून केल्यानंतर संजय हा कानपूरला पळून गेला होता, ठाणे पोलिसांनी त्याला तिथूनच उचलला होता. चौकशी दरम्यान त्याने खुनाची कबुली दिली आणि त्यामागचं कारणही सांगितलं.