
सामना ऑनलाईन। सिएटल
कामावरून निवृत्त झाल्यानंतर अनेकजण पुढील आयुष्य आरामात जगण्याला पसंती देतात. तर काहीजण देवधर्मात, समाजकार्यात रमतात. पण अमेरिकेतील सिएटल येथील एका जोडप्याने निवृतीनंतर जग फिरायला सुरुवात केली आहे. त्यासाठी लागणारा खर्च भरून काढण्यासाठी या जोडप्याने चक्क घरदार, बोट व इतर संपत्तीही विकली आहे. मायकल (72) व डेबी (62) अशी त्यांची नावे आहेत. आतापर्यंत 250 शहरांना त्यांनी भेटी दिल्या आहेत.
या हौशी जोडप्याने 2013 साली आपली ही जगभ्रमंती सुरू केली. ज्या देशात ते जातात. तेच आपलं घर आहे. असं ते सांगतात. त्यातच हॉटेलचा खर्च परवडत नसल्याने मायकल आणि डेबी एअरबीएनबीच्या माध्यमाने एखाद्या कुटुंबाच्या घरात जाऊन राहतात. यामुळे त्या देशातील संस्कृती जवळून बघता येते, असे मायकलचे म्हणणे आहे. एका दिवसासाठी हे जोडपे त्या कुटुंबाला साडेसहा हजार रुपये देतात. त्याचबरोबर पैसे वाचवण्यासाठी स्वत:साठी नाही पण दुसऱ्यांसाठी परदेशातून भेटवस्तूही आणतात.
या जोडप्याचा Senior Nomads’ नावाचा ब्लॉगही आहे. त्यावर ते आपले अनुभव शेअर करतात. त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही वाढत आहे. जगभ्रमंतीमुळे आम्हांला पुन्हा एकदा तरुण झाल्यासारखे वाटते असे मायकेल व डेबी सगळ्यांना सांगतात.




























































