
वाहन उद्योगातील अग्रणी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीतील कामगारांना यंदा कमाल दीड लाख रुपये बोनस मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या भरीव बोनस वाटाघाटीच्या यशात कामगार नेते, शिवसेना उपनेते आमदार सचिन अहिर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे.
2022-23 या वर्षाच्या बोनससाठी कंपनी आणि महिंद्रा एम्प्लाईज फेडरेशन यांच्यामध्यें नुकत्याच वाटाघाटी होऊन बोनसचा भरीव करार संपन्न झाला. आंतरराष्ट्रीय वाहन उद्योगातील अग्रणी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीतील 12 हजारांपेक्षा अधिक कामगारांना दोन पी.एफ. बेस पगार अधिक 19,501 रुपये असे मिळून बोनसपोटी भरीव रक्कम मिळणार आहेत. बोनसची रक्कम कामगारांना दिवाळीपूर्वी म्हणजेच 6 नोव्हेंबर रोजी मिळणार आहे. त्यामुळे सर्व युनिटच्या कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. या फेडरेशनमध्ये ऑटो सेक्टर कांदिवली, नाशिक, इगतपुरी, हरिद्वार व फार्म सेक्टर कांदिवली आणि नागपूर इत्यादी युनिटचा समावेश होतो.



























































