
लाईक करा आणि कमवा टास्कच्या नावाखाली महिलेची 12 लाख रुपयांची फसवणूक प्रकरणी एकाला मुंबई पोलिसांच्या पश्चिम सायबर पोलिसांनी अटक केली. सिद्धार्थ चॅटर्जी असे त्याचे नाव आहे. तो सायबर ठगांना फसवणुकीसाठी बँक खाते उपलब्ध करून द्यायचा. त्याच्या मोबदल्यात त्याला 30 हजार रुपये कमिशन मिळत असायचे.
तक्रारदार या महिला आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांना मोबाईलवर मेसेज आला होता. पार्ट टाइम नोकरीस आपण इच्छुक आहात का अशी विचारणा केली. त्यानंतर त्याना एकाने फोन केला. रेटिंग दिल्यास पैसे मिळतील असे त्यांना सांगण्यात आले. त्यावर विश्वास ठेऊन सुरुवातीला त्याने काही रेटिंग दिले. रेटिंगच्या बदल्यात त्यांना काही पैसे खात्यात जमा झाले. त्यानंतर पेड टास्कच्या नावाखाली त्याच्याकडून 12 लाख 92 हजार रुपये उकळले. पैसे दिल्यानंतर त्याच्याकडून आणखी पैशाची मागणी होऊ लागली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने पश्चिम सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला.
तपासा दरम्यान पोलिसांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस कोलकाता येथे गेले. तेथून पोलिसांनी टॅक्सी ड्रायव्हर असलेल्या सिद्धार्थला ताब्यात घेऊन अटक केली. सिद्धार्थने आतापर्यंत ठगांना 35 बँक खाती उपलब्ध होती. त्या खात्यात फसवणुकीचे पैसे जमा होत होते. बँक खाते उपलब्ध करून देण्याच्या मोबदल्यात सिद्धार्थला 30 हजार रुपये मिळत असायचे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 7 लाख रुपये असलेली अनेक खाती गोठवली आहे. सिद्धार्थकडून पोलिसांनी 10 डेबिट कार्ड, 10 सिम कार्ड आणि दोन मोबाईल जप्त केले आहेत. ज्याचा वापर फसवणुकीसाठी केला गेला होता. सिद्धार्थला एका व्यक्तीने या गुन्हेगारी जगतात आणले होते. टेलिग्राम चॅनल्सद्वारे काही माहिती दुबईतील ठगांना पुरवण्यात आली होती. काही पैसे दुबई येथे पाठवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. सिद्धार्थचे दुबई कनेक्शन समोर आले असून मुख्य सूत्रधाराचा पोलीस शोध घेत आहेत. सिद्धार्थला अटक करून न्यायालयात हजर केले होते.
























































