भुईंजमध्ये दोन दुचाकींच्या धडकेत एकाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भुईंज ते किसनवीर कारखाना रस्त्यावर वारागडेवाडी येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एकजण ठार झाला असून, दुसरा दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झाला आहे.

रवींद्र ज्ञानदेव शिंदे (वय 50, रा. जांब, ता. वाई) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. या अपघातात पांडेवाडी (ता. वाई) येथील अभिजित दळवी गंभीर जखमी झाले आहेत.

भुईंजनजीक वारागडेवाडी येथे जांबकडे निघालेली व भुईंजकडे येत असलेली दुचाकी यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात दोन्ही दुचाकीस्वारांना गंभीर इजा झाली. यादरम्यान घटनास्थळी भुईंजचे उद्योजक रमेश चिकणे हे किसनवीर कारखान्याकडे निघाले असता त्यांनी जखमींना रुग्णालयात नेण्यास मदत करत भुईंज पोलिसांना घटनेची माहिती दिली. यातील दोन जखमींपैकी भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्रात रवींद्र ज्ञानदेव शिंदे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले, तर गंभीर जखमी असलेले अभिजित दळवी
यांना पुढील उपचारासाठी सातारा येथे पाठविण्यात आले आहे.

या अपघातातील मृत व जखमी दोघांचेही बंधू पोलीस दलात असून, मयत रवींद्र शिंदे यांचा बंधू पुणे पोलीस दलात, तर जखमी अभिजित दळवी यांचे बंधू महाबळेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. घटनेची नोंद भुईंज पोलीस स्टेशनमध्ये झाली असून, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे तपास करत आहेत.