कोपरगावच्या आयटीआयमधील लाचखोर कर्मचाऱ्याला अटक

सेवानिवृत्त झाल्यानंतर चार्ज क्लिअर करण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी कोपरगावच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) भांडारपाल (स्टोअरकिपर) विलास चिमाजी कुसाळकर ( वय 52) यांना अटक करण्यात आली आहे. तीस हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले आहे. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदारांचे सासरे ऑगस्ट 2018 मध्ये शासकीय आयटीआय, कोपरगाव येथून सेवानिवृत्त झाले होते. भांडारगृहाचा चार्ज देताना काही वस्तु कमी असल्याचे कारण सांगत त्यांचे सेवानिवृत्तीनंतर मिळणारे आर्थिक लाभ ,पेन्शन , सातवे वेतन आयोगाचा फरक रोखून धरण्यात आला होता. तक्रारदारांनी सासऱ्यांसोबत संबधितांची भेट घेतली असता त्यांनी गहाळ वस्तू बाहेरून खरेदी करुन आणाव्या आणि 50 हजार रुपये दिल्यास त्यांचा चार्ज क्लिअर करुन वरिष्ठांनाकडे प्रमाणपत्र पाठवतो, असे सांगितले. तक्रारदारांनी नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. विभागाच्या पडताळणीत तक्रार सत्य असल्याचे आढळले. विभागाने पुणतांबा चौफुली येथील हॉटेल आनंद परमीटरुमसमोर सापळा लावला. त्यावेळी तक्रारदारंकडून लाच घेताना आरोपीला अटक करण्यात आली. कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या