नीचांकी आवक असतानाही कांद्याचे बाजारभाव उतरले

98

सामना प्रतिनिधी । राहुरी

निच्चांकी आवक असताना देखील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यावर कांद्याचे बाजारभाव उतरले असून अवघ्या दोन दिवसात कांद्याच्या बाजारभावात क्विंटल मागे १०० रूपयांचा फरक झाला आहे. दरम्यान, १०० रूपयाने बाजारभाव कमी झाले. यापेक्षा जेमतेम आवक असतानाही बाजारभाव कमी झाल्याची चर्चा आज ऱविवारी राहुरीच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यात होती.

आज रविवारी राहुरी बाजार समितीच्या मोंढ्यावर १३ हजार १४७ गोणी कांद्याची आवक झाली. १नंबर कांद्याला ८०० ते १००० रूपये क्विंटलचा भाव मिळाला. दोन दिवसांपूर्वी ४० हजार ८०६ गोणी कांद्याची आवक असताना १ नंबर कांद्याला ८५० ते ११०० रूपये क्विंटलचा भाव मिळाला होता. तर राहुरीशी संलग्न असलेल्या वांबोरी या उपबाजार समिती मध्ये देखील बाजारभावाची स्थिती सारखीच होती.

शेतमालाची आवक कमी बाजारभाव जास्त हे व्यापारी गणित ओळखले जात असले तरी राहुरी कृषि उत्पन्न बाजार समितीत बाजारभावाचे गणित सध्या उलटे झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी संभ्रमात पडला आहे. आज मोंढ्यावर ३३६ गोणी कांद्याला १००० रूपये क्विंटल पर्यंत भाव मिळाला. २ नंबर कांद्याला ५०० ते ७९० रूपये, ३ नंबर कांद्याला २०० ते ४९० रूपये तर गोल्टी कांद्याला ५५० ते ८५० रूपये क्विंटलचा भाव मिळाला. आज रविवारच्या मोंढ्यावर २६ गोणी कांदा १२५० रूपये, ३३ गोणी कांदा ११५० रूपये तर २५ गोणी कांद्याची ११०० रूपये क्विंटल या अपवादात्मक बाजारभावाने विक्री झाली.

कर्नाटक व आंध्रप्रदेश राज्यातील नवा कांदा हैद्राबाद, बेंगलोर भागात दाखल होत आहे. या कांद्याची आवक १० हजार टन आहे. मध्यप्रदेश व राजस्थान येथील कांदा आणखी महिनाभर बाजारात येणार आहे. साऊथ मध्ये नवा कांदा आहे. पर्यायाने महाराष्ट्रातील कांद्याला या परप्रांतात सध्या तरी गि-हाईक नाही. याचा परिणाम बाजार भावावर झाला आहे.

पोळ्याच्या सणानंतर देखील महाराष्ट्रात जुना गावरान कांदा ५० टक्के शिल्लक असुन हा कांदा पुढील तीन महिने बाजारात विक्रीसाठी येणार आहे. महाराष्ट्राच्या कांद्याला मागणी असलेल्या परराज्यात उपलब्ध असलेला स्थानिक कांदा हा खऱ्या अर्थाने बाजारभावा बाबत चढउतार करणारा ठरला आहे.

आंध्रप्रदेश, कर्नाटक या भागात सांबर हे आवडते खाद्य असल्याने सांबर बनविण्यासाठी महाराष्ट्रातील गोलटी कांद्याला विशेष मागणी असते. माञ या राज्यात स्थानिक कांदा बाजारात येत असल्याने महाराष्ट्रातील गोलटी कांद्याचा देखील कमी झाला आहे.

आंध्रप्रदेश कर्नाटक येथील ८०० ते १००० ट्रक ( १० हजार टन नवा कांदा ) हैदराबाद, बंगलोरच्या बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहे. तर मध्यप्रदेश व राजस्थान येथे महिनाभर पुरेल एवढा कांदा साठा शिल्लक आहे. हा परिणाम महाराष्ट्रातील कांद्याच्या बाजारभावावर झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या