
ऐन सणासुदीच्या काळात कांद्याने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणल्यावर केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी आणि साठेबाजांवर नियंत्रण आणल्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. घाऊक विक्रीत किलोला 51 रुपये असे शिखर गाठलेल्या कांद्याच्या लासलगावमधील किमतीत किलोला 30 रुपये अशी घसरण झाली आहे.देशातील कांदा विक्रीचा देशातील भाव ठरवणाऱ्या लासलगाव बाजारपेठेत कांद्याचा सरासरी घाऊक विक्रीचा किमान भाव 26 रुपये किलोवरही आला होता.
सप्टेंबरच्या मध्यावर लासलगाव बाजारपेठेत कांद्याच्या घाऊक विक्रीच्या भावाने किलोला 51 रुपये अशी उच्चांकी पातळी गाठली होती. नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने गुरूवारी कांद्याच्या घाऊक विक्रीचे सरासरी दर किलोला 26 रुपये असे निश्चित केले होते. समितीच्या निर्देशानुसार घाऊक कांदा विक्रीचा किलोला कमाल भाव 30 रुपये 20 पैसे तर किमान भाव 15 रुपये असा ठरवण्यात आला होता.राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास फाउंडेशनने केलेल्या सर्वेक्षणानुसार सरकारी उपाययोजनांमुळे कांद्याचे भाव आता खाली येणार आहेत.महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पुरामुळे कांद्याच्या पुरवठ्यावर प्रतिकूल परिणाम झाला होता.त्यानंतर खरिप पिकांतही कांद्याच्या उत्पादनात घट होण्याच्या भीतीने कांद्याचे दर देशभरातील बाजारांत गगनाला भिडले होते.
खरिपाचे पीक आल्यावर भाव नियंत्रणात येतील
सध्या बाजारात गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामाचा कांदा विकला जातोय.आता बाजारात खरीप हंगामातील कांद्याचा साठा आल्यावर कांद्याचे भाव देशभरात नियंत्रणात येतील.त्यामुळे देशातील ग्राहकांना दिलासा मिळणार असल्याचा अहवाल राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन आणि विकास फाउंडेशनने दिला आहे.दिल्लीत तर कांद्याच्या भावाने किरकोळ बाजारात किलोला ६० ते ७० रुपये अशी उच्चांकी पातळी गाठली होती.हि समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारने विविध राज्यांना नाफेडमार्फत कांद्याचा आवश्यक साठा करण्याची परवानगी दिली आहे.त्यामुळे आतातरी कांदा ग्राहकांना रडवणार नाही अशी चिन्हे दिसत आहेत.

































































