
नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी ऑनलाइनद्वारे जेवणाची थाळी मागवत असाल तर सावधान. फसवणुकीसाठी सायबर भामटय़ानी एका थाळीवर दोन थाळ्या मोफत अशी जाहिरात फेसबुकवर प्रसारित केली आहे. त्या जाहिरातीखाली दिलेल्या लिंकवर क्लिक करण्यास सांगून बँक खात्यावर डल्ला मारला जात आहे. फसवणुकीचा हा नवा प्रकार असल्याचे सायबर पोलिसांचे म्हणणे आहे.
बँकेतून बोलतोय, तुमचे केवायसी अपडेट तर कधी विम्याच्या नावाखाली नागरिकांना फोन करून त्याच्या बँक खात्याचे तपशील मिळवून फसवणूक केली जाते. फसवणुकीसाठी दरवेळी नवीन आयडिया शोधून काढतात. फसवणूक करणारे हे एखादा सण आला की अमुक एक कंपनी तुम्हाला डिस्काऊंट किंवा मोफत वस्तू देणार असल्याचे मेसेज सोशल मीडियावर पाठवून फसवणूक करतात.
नवीन वर्षाच्या अनुषंगाने अनेक जण हे सेलिब्रेशनसाठी हॉटेलमधून जेवणाची थाळी मागवतात. त्या थाळीच्या नावाखाली बँक खात्यावर डल्ला मारला जात आहे. मुंबईतील एका तरुणीची अशा प्रकारे फसवणूक झाली आहे. फसवणूक करणाऱयांनी मुंबईतील 5 प्रसिद्ध हॉटेल आणि पुण्यातील 1 हॉटेलमध्ये एका थाळीवर दोन जेवणाच्या थाळ्या फ्री अशी जाहिरात फेसबुकवर प्रसिद्ध केली आहे.
लिंक पाठवून लावतात चुना
हॉटेलमध्ये बुकिंगसाठी एक नंबर दिला जातो. त्या नंबरवर संपर्प केल्यावर व्हाट्स अपवर एक लिंक पाठवली जाते. बुकिंगसाठी दहा रुपये भरण्यास सांगतात. जेवणाची थाळी 250 रुपयाची असून जेवण घरी आल्यावर त्याचे पैसे द्या अशा भूलथापा मारल्या जातात. बोलण्यात गुंतवून एक लिंक पाठवून माहिती भरण्यास भाग पाडतात. माहिती भरल्यावर बँक खात्यावर डल्ला मारला जातो.
एक थाळीवर दोन थाळी फ्रीच्या फसव्या जाहिरातीला नागिरकांनी बळी पडू नये. फेसबुकवरच्या जाहिरातीवरून आलेली ती लिंक उघडू नका. बँक खात्याची गोपनीय माहिती शेअर करू नका.
– रश्मी करंदीकर, पोलीस उपायुक्त, सायबर





























































