गाव तिथे ग्रंथालय संकल्पना कागदावरच, रायगड जिल्ह्यात अवघी 76 ग्रंथालये

216

सामना प्रतिनिधी । अलिबाग

सुसंस्कृत समाज घडविण्यात वाचनालयांचे योगदान महत्वाचे मानले जाते. चांगले विचार, चांगले आचार रुजविण्याचे काम या माध्यमातून होत असते. मात्र माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या जगात आज वाचनालये आणि वाचनसंसंस्कृती यांना घरघर लागली आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या रायगड जिल्ह्यात 76 ग्रंथालयेच सध्या कार्यरत राहिली आहेत. या वाचनालयांमधील वाचकांच्या संख्येत झपाट्याने घट होत आहे. दुसरीकडे गाव तिथे ग्रंथालये संकल्पना कागदावरच आहेत. त्यामुळे आगामी काळात वाचनालये आणि ग्रंथालयांनां आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी व्यापक प्रय़त्न करावे लागणार आहेत.

रायगड जिल्ह्यात 76 ग्रंथालये सध्या कार्यरत आहेत. यात शंभर वर्षांची परंपरा असणाऱ्या 9 ग्रंथालयांचा समावेश आहे. अलिबाग. शहाबाज, मुरुड, श्रीवर्धन, महाड, रोहा, सुधागड पाली, माथेरान आणि कर्जत ग्रंथालयांची शतकोत्तर वाटचाल सुरु आहे. पण या ग्रंथालयांमधील वाचकांची संख्या रोडावत असल्याचे दिसून येते आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या आठ वर्षात जिल्ह्यात एकही नवीन ग्रंथालय सुरु होऊ शकलेले नाही. हि पण एक शोकांतिका आहे. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 1960 च्या दशकात गाव तिथे ग्रंथालय हि संकल्पना मांडली होती. मात्र पन्नास वर्षानंतरही राज्यातील 75 टक्के गावांमध्ये ग्रंथालयांची स्थापना होऊ शकलेली नाही. रायगड जिल्ह्यात 1975 महसुली गावे आहेत. यापैकी केवळ 4 गावांमध्ये ग्रंथालये अस्तित्वात आहे. शासनाचे धोरण आणि अमंलबजावणी यातील हा विरोधाभास यावरून स्पष्ट होतो.

गाव तिथे ग्रंथालय मोहिमे अंतर्गत ग्रामपंचायतीनी वाचनालये सुरुवात करावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. पण स्थानिक ग्रामपंचायतीकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. ग्रामपंचायतीनी वाचनालये, ग्रंथालये आणि अभ्यासिका सुरु करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना शासनाच्या नियमानुसार सहकार्य दिले जाईल – धरमसिंग वळवी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी रायगड

आपली प्रतिक्रिया द्या