
सामना ऑनलाईन । मुंबई
राज्यातील शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी, बोंडअळीग्रस्तांना मदत, दुष्काळ, कायदा व सुव्यवस्था, पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसची दरवाढ अशा सर्वच आघाडय़ांवर भाजप सरकारने महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केली आहे. भाजप सरकार म्हणजे ‘ठग्ज ऑफ महाराष्ट्र’ आहे. त्यामुळे ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’ चित्रपट फ्लॉप करणारी जनता राज्यात भाजपला भुईसपाट केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला रविवारी भाजप सरकारवर तोफ डागली.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. अधिवेशनातील विरोधी पक्षांची रणनीती ठरवण्यासाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची बैठक व त्यानंतर पत्रकार परिषद आयोजित केली होती. पत्रकार परिषदेच्या व्यासपीठाच्या मागे ‘ठग्ज ऑफ महाराष्ट्र-ठगबाजीची चार वर्षे’ अशा शब्दांत भाजप सरकारचे वर्णन करणारे पोस्टर लावले होते. त्यात ‘ठग्ज ऑफ हिंदुस्थान’च्या पोस्टरवरील आमीर खानच्या फोटोऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो लावला होता. त्याकडे बोट दाखवत राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राज्यातील जनतेची फसवणूक करणारे भापज सरकार म्हणजे ‘ठग्ज ऑफ महाराष्ट्र’ असल्याचे वर्णन केले.
ते म्हणाले, भाजप सरकार कोणत्याच प्रश्नावर गंभीर नाही. या वर्षात ऑक्टोबर महिन्यापर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यात 2 हजार 300 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतकऱ्यांची राज्यात भयानक अवस्था आहे. 1972 च्या दुष्काळाच्या परिस्थितीपेक्षा राज्यात भयानक परिस्थिती आहे. दुष्काळ जाहीर करायला विलंब झाला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हेक्टरी 50 हजार रुपयांची व फळबागांना हेक्टरी एक लाख रुपये तातडीने मदत जाहीर करावी.
आरक्षणाला विलंब का?
मराठा आरक्षणाचा अहवाल अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहाच्या पटलावर ठेवण्याची मागणी त्यांनी केली. मराठा समाजाचा अहवाल येण्यापूर्वीच मुख्यमंत्री मुक्ताफळे उधळत होते. 1 डिसेंबर रोजी जल्लोष साजरा करा असे मुख्यमंत्री सांगत होते, पण धनगर समाजाबाबतचा ‘टीस’ या संस्थेचा अहवाल प्राप्त होऊनही सरकार त्याबद्दल वाच्यता करीत नाही. धनगर समाजाबरोबर मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबताही सरकारने या अधिवेशनात निर्णय घ्यावा.
सरकारने माफी मागावी
स्वातंत्र्यसैनिक व विधान परिषदेतील पहिले विरोधी पक्षनेते माधवराव गायकवाड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले नाहीत. या दिरंगाईचा निषेध आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्तावाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी गायकवाड कुटुंबीयांची व राज्यातील जनतेची माफी मागावी अशी मागणी विखे-पाटील यांनी केली.
चहापानावर बहिष्कार
राज्यातल्या निक्रिय व फसव्या भाजप सरकारचे चहापान स्वीकारणे म्हणजे राज्यातील साडेअकरा कोटी जनतेच्या भावनांशी प्रतारणा होईल. त्यामुळे विरोधी पक्षांच्या सर्व सदस्यांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातल्याचे विखे-पाटील म्हणाले. या पत्रकार परिषदेला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शेकापचे आमदार जयंत पाटील, लोकतांत्रिक जनता दलाचे कपिल पाटील आदी उपस्थित होते.






























































