
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याच्या विरोधात देशभरातील शेतकऱयांबरोबरच विरोधी पक्ष एकवटले आहेत. यूपीए अधिक बळकट करण्यासाठी देशभरात महाराष्ट्र पॅटर्न राबवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात शरद पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे हाच महाराष्ट्र पॅटर्न देशभरात राबवण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. विरोधकांना एकत्र आणून भाजपला आव्हान देण्याचा यूपीएतील घटक पक्षांचा आग्रह आहे.
घटक पक्षांचा आग्रह, पण पवारांचा नकार
राष्ट्रीय पातळीवरील आजच्या विरोधकांची एकजूट करणे आवश्यक आहे आणि त्यादृष्टीने मी काम करीत आहे, असे शरद पवार यांनी यापूर्वी सांगितले होते. केंद्रात विरोधी पक्ष नेते म्हणून शरद पवार यांनी याआधी काम केले आहे. सध्या देशातील विविध भागांत भाजपचे वर्चस्व वाढत आहे. या पार्श्वभूमीवर यूपीए मजबूत करण्यासाठी शरद पवार यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याचा आग्रह यूपीएच्या घटक पक्षांकडून धरला जात आहे. पण शरद पवार यांनी नकार दिला आहे.
प्रादेशिक पक्षांना एकत्र
काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण इथून सुरुवात आहे. तर प्रादेशिक पक्ष कोणत्या नेतृत्वाखाली एकत्र येतील हा प्रश्न अनुत्तरित आहे. या दोन्हींचा मध्य म्हणून भाजपविरोधी आघाडी बळकट करण्यासाठी शरद पवार यांच्याकडे पाहिले जात आहे. भाजप विरोधात सर्व प्रादेशिक पक्षांना एकत्र आणण्यात शरद पवार महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असे यूपीएतील घटक पक्षांच्या नेत्यांना वाटते.































































