
एसटी महामंडळाने आपल्या कर्मचार्यांना आता खाजगी बँकेत वेतन खाते उघडण्याची शिफारस केली आहे. यापूर्वी एसटी कर्मचार्यांची वेतन खाती भारतीय स्टेट बँक आणि स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेतच होती. आता त्यांना खाजगी बँक असलेल्या फेडरल बँक, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेमध्ये वेतन खाते उघडण्यासाठी सांगण्यात आले आहे.
ज्या कर्मचार्याने भारतीय स्टेट बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेतले असेल त्यांनी इतर बँकामध्ये वेतन खाती उघडण्यापूर्वी भारतीय स्टेट बँकेचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. त्याच धर्तीवर ज्या कर्मचा-याने स्टेट ट्रान्सपोर्ट बँकेकडुन कोणतेही कर्ज या उचल (ओव्हर ड्राफ्ट) घेतले असल्यास अशा कर्मचारी – अधिकारी यांस इतर बँकामध्ये वेतन खाती उघडण्यापुर्वी स्टेट ट्रान्सपोर्ट बँकेचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ प्राप्त करुन घेणे बंधनकारक राहील.
इतर बँकात खाते असल्यासही चालणार
एसटी कर्मचार्यांना जर इतर बँकामधल्या असलेल्या त्यांच्या बचत खात्यातच वेतन प्राप्त करून घ्यावयाचे असल्यास, त्यांना सदर बँकेत असलेले बचत खाते हे वेतन खात्यात परावर्तित करून घेण्याची कार्यवाही ही वैयक्तिक स्तरावर करून घेणे आवश्यक राहील. एसटी कर्मचार्यांच्या वैयक्तीक कर्जाची हमी महामंडळ घेणार नाही तसेच आर.टी.जी.एस -एन.इ.एफ.टी बाबतचा आकार कर्मचार्यांकडूनच वसुल करण्यात येईल असे एसटी प्रशासनाने म्हटले आहे.



























































