
सामना प्रतिनिधी । कुडाळ
सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन हा कृषी विभागाचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. कारण यामुळेच शेतकर्यांना अधिकचे उत्पन्न मिळणार आहे. सेंद्रिय शेती मधून कृषी मालाची निर्मिती केल्यास ग्राहकांनाही सकस उत्पादने मिळू शकतील. आजच्या काळात सेंद्रिय माल घेण्याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. ही संधी ओळखून प्रत्येक गावात सेंद्रिय शेतीची कास धरली पाहिजे. निरूखे गावातील अल्पभूधारक शेतकर्यांनी एकत्र येवून गट स्थापन करून सेंद्रिय शेतीची सुरूवात केली आहे. आपल्या गावात झालेले काम हे इतर शेतकर्यांना पथदर्शक ठरेल असे प्रतिपादन शिवसेना गटनेते तथा जि.प.सदस्य नागेंद्र परब यांनी निरूखे येथे बोलताना केले.
परंपरागत कृषि विकास योजनेतून सेंद्रिय शेतीचा उपक्रम निरूखे येथील श्री देव रवळनाथ सेंद्रिय गटाच्या माध्यमातुन राबविण्यात येत आहे. या शेतकर्यांना रब्बी हंगामात सेंद्रिय बि-बियाणे निर्मितीचे प्रशिक्षण तालुका कृषि अधिकारी, कुडाळ कार्यालयाच्या वतीने नुकतेच घेण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नागेंद्र परब बोलत होते. प्रशिक्षणाचे उद्घाटन त्यांचे हस्ते झाले. परब पुढे म्हणाले कि, येत्या रब्बी हंगामात कमी कालावधीची पिके घेताना सेंद्रिय पध्दतीचा वापर केल्यास त्याचे विक्री बाबत आपण प्रयत्न करू असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी तालुका तंत्रज्ञान व्यस्स्थापक (वेंगुर्ले) धनंजय गोळम यांनी गट सदस्यांना विविध कडधान्य बि-बियाणे वापर व रोपे निर्मितीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी सेंद्रिय शेतीच्या विविध स्लाईडस शेतकर्यांना दाखविण्यात आल्या.
प्रशिक्षणाचे अध्यक्षस्थान निरूखे सरपंच सौ. मंजिरी करंदीकर यांनी भूषविले. प्रशिक्षण वर्गात कृषि अधिकारी तोरणे, कृषि पर्यवेक्षक अमोल करंदीकर यांनीही मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाचे आयोजन टि. बी गवस, कृषि सहाय्यक निरूखे अनिरूध्द करंदीकर व सत्यवान नाईक यांनी केले. यावेळी ग्रामस्थ व महिला वर्ग उपस्थित होता.


































































