
सामना ऑनलाईन, नागपूर
मल्टिप्लेक्समध्ये बाहेरचे खाद्यपदार्थ आणण्यास मनाई करणाऱया मल्टिप्लेक्सवर १ ऑगस्टपासून कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत दिले. याशिवाय छापील किमतीपेक्षा जास्त दराने वस्तू विकणाऱयांनाही कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी माहिती त्यांनी दिली.
मल्टिप्लेक्स, महामार्गावरील फुडमॉल व मॉल्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ खाण्यास मनाई करण्यात येते. तसेच तिथे खाद्यपदार्थ भरमसाट दराने विकले जातात. यासंदर्भात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, संजय दत्त, अनिल भोसले, डॉ. नीलम गोऱहे, प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना मांडली होती. पाण्याची बाटली किंवा अन्य खाद्यपदार्थ यांचे दर मल्टिप्लेक्स, मॉलमध्ये वेगळे आणि बाहेर वेगळे का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
या लक्षवेधीला उत्तर देताना चव्हाण यांनी केंद्र सरकारने कायदा केला असून येत्या १ ऑगस्टपासून एकाच वस्तूची वेगवेगळी किंमत राहणार नसल्याचे सांगितले. तसेच घरगुती पदार्थ मल्टिप्लेक्समध्ये खाण्यास विरोध करणाऱयांबाबत अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे तक्रार केल्यास कारवाई करू असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, यावर धनंजय मुंडे यांनी आक्षेप घेतला व बडय़ा वस्तूंच्या उत्पादकांना जुना माल संपावा यासाठी १ ऑगस्टची मुदत दिली जात असताना हीच दया लहान प्लॅस्टिक उत्पादकांना का दाखविण्यात आली नाही, असा प्रश्न करीत सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली.
तिकीट मराठीत छापा; शिवसेनेची मागणी
कर्नाटकात मल्टिप्लेक्समधील सिनेमाचे तिकीट तेथील मातृभाषा कानडीत छापलेले असते. महाराष्ट्रात ते इंग्रजीत छापलेले असते. सिनेमाची तिकिटे मातृभाषेत छापण्यास काय त्रास होता असा सवाल यावेळी करतानाच तिकिटे मराठीत असावी, अशी सूचना शिवसेना आमदार डॉ. नीलम गोऱहे यांनी केली.






























































