
बहुरूपी ओमायक्रोन व्हेरिएंटने अखेर हिंदुस्थानातही आपले खरे रूप दाखवायला सुरुवात केली आहे. अवघ्या तीन आठवडय़ांत 11 राज्यांत फैलावलेल्या या व्हेरिएंटची रुग्णसंख्या 113 वर गेली आहे. शुक्रवारी दिल्लीत 10, महाराष्ट्रात 8, उत्तर प्रदेश, गुजरात, तेलंगणामध्ये प्रत्येकी 2 नवीन रुग्ण आढळले. त्यामुळे गुरुवारी 87 वर पोहोचलेली रुग्णसंख्या एका दिवसात थेट शंभरीपार गेली. दिवसभरात सर्वाधिक 26 रुग्णांची भर पडली.
देशात महिनाभरापासून मूळ कोरोनाच्या रुग्णसंख्येत घसरण होत आहे. मागील 20 दिवसांत कोरोनाची दैनंदिन रुग्णसंख्या 10 हजारांच्या खाली नोंद होत आहे. सर्व राज्यांचा विचार करता केवळ केरळमध्ये कोरोनाचा उद्रेक आटोक्यात आलेला नाही. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांमध्ये केरळच्या रुग्णांचे प्रमाण 40.31 टक्के आहे. इतर राज्यांमध्ये कोरोना नियंत्रणात येत आहे. मात्र आता ओमायक्रोनच्या संसर्गाने सर्व राज्यांची धडधड वाढवली आहे.
महाराष्ट्रात आणखी 8 रुग्ण
राज्यात ओमायक्रोनचे आज 8 रुग्ण सापडले आहेत. यापैकी 6 रुग्ण पुण्यात, एक रुग्ण मुंबई आणि एक रुग्ण कल्याण-डोंबिवली महापालिकेत सापडला आहे. त्यामुळे राज्यातील ओमायक्रोनच्या रुग्णांची संख्या 40 झाली आहे. दरम्यान, ओमायक्रोनचे मुंबईतील 14 पैकी 13 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून एकावर सेव्हन हिल्स रुग्णालयावर उपचार सुरू आहेत. त्यामुळे आता मुंबईत ओमायक्रोनचे दोन सक्रिय रुग्ण आहेत.
91 देशांत घुसखोरी; डेल्टापेक्षा सुपरफास्ट
ओमायक्रोनने जगभर मोठा हाहाकार उडवला आहे. आतापर्यंत तब्बल 91 देशांमध्ये घुसखोरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत अधिक वेगाने फैलावला आहे. याच्या संसर्गामुळे अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट झाला आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. जगभरातील ओमायक्रोनची एकूण रुग्णसंख्या 27 हजारांच्या पुढे गेली आहे. दक्षिण आफ्रिकेत दररोज नोंद होत असलेल्या नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये 98 टक्के रुग्ण ओमायक्रोनबाधित असल्याचे आढळून आले आहे.




























































