
हिंदुस्थानचा विराट कोहली आणि पाकिस्तानचा बाबर आझम यांच्यात नेहमीच तुलना होते. अर्थात विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीच्या जवळपासही बाबर आझम पोहोचलेला नाही. परंतु नुकताच त्याने विराटचा एक विक्रम मोडला आहे. बुधवारी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना बाबरने इतिहास रचत विराटला ओव्हरटेक केले आणि नव्या विक्रमाची नोंद केली.
वेस्ट इंडिजविरुद्ध बाबर आझम याची बॅट पुन्हा तळपली. 300 हून अधिक धावांचा पाठलाग करताना बाबर आझम याने झुंजार शतकी खेळी केली. त्याने 107 चेंडूंचा सामना करत 103 धावा चोपल्या. या खेळीदरम्यान त्याने 9 चौकार ठोकले. यासह बाबर आझम याने कर्णधार म्हणून सर्वात वेगाने 1 हजार धावा ठोकण्याचा विक्रम केला आहे.
वन डे क्रिकेटमध्ये याआधी कर्णधार म्हणून खेळताना सर्वात वेगाने 1 हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा विक्रम विराट कोहली याच्या नावावर होता. विराटने 17 व्या डावामध्ये हा पल्ला गाठला होता. मात्र बाबर आझम याने 13 डावांमध्येच ही कामगिरी केली आहे. 27 वर्षीय बाबरने वन डे मध्ये कर्णधार म्हणून 13 डावात फलंदाजी करताना 91.36 च्या सरासरीने 1005 धावा ठोकल्या आहेत. या दरम्यान त्याने 6 शतक आणि 3 अर्धशतक ठोकले. 103.71 च्या जबरदस्त स्ट्राईकरेटने त्याने या धावा केल्या आहेत.
पहिल्या टी-20 लढतीच्या आधीच टीम इंडियाला झटका, कर्णधार के.एल.राहुल, कुलदीप यादव जायबंदी
शतकांची हॅटट्रीक
बाबर आझम याने आंतरराष्ट्रीय वन डे मध्ये 17 शतक ठोकली आहेत. वेस्ट इंडिजविरुद्ध शतक ठोकण्यासह त्याने दुसऱ्यांदा शतकांची हॅटट्रीक साजरी केली. याआधी 2016 मध्ये त्याने अशी कामगिरी केली होती.
पाकिस्तानचा विजय
वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना 8 विकेट्स गमावून 305 धावा केल्या. शाई होप याने 127 धावांची शतकी खेळी केली. या धावांचा पाकिस्तानने यशस्वी पाठलाग करत चार चेंडू बाकी असतानाच लक्ष्य गाठले. पाकिस्ताने 5 विकेट्सने हा सामना जिंकत मालिकेत 1-0 आघाडी घेतली.

























































