पाकिस्तानची अंधुकशी आशा कायम, बांगलादेशवर दणदणीत विजय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लागोपाठच्या चार पराभवांनंतर अखेर पाकिस्तानने मंगळवारी बांगलादेशला धूळ चारून क्रिकेट वर्ल्ड कपमधील तिसरा विजय मिळविला. या विजयासह पाकिस्तानने उपांत्य फेरीच्या आशा अंशुकशा का होईना, पण कायम ठेवल्या आहेत. सर्वाधिक 81 धावांची खेळी करणारा फखर जमान या विजयाचा शिल्पकार ठरला.

बांगलादेशकडून मिळालेले 205 धावांचे लक्ष्य पाकिस्तानने 32.3 षटकांत 3 फलंदाजांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले. अब्दुल्लाह शफीक (68) व फखर जमान (81) यांनी 21.1 षटकांत 128 धावांची सलामी देत पाकिस्तानच्या विजयाची पायाभरणी केली. बांगलादेशच्या मेहदी हसनने या दोघांसह कर्णधार बाबर आझमलाही (8) बाद केले. मात्र, तोपर्यंत फार उशीर झाला होता. शेवटी मोहमद रिझवान (नाबाद 26) व इफ्तीखार अहमद (नाबाद 17) यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय बांगलादेशच्या अंगलट आला. त्यांचा डाव 45.1 षटकांत 204 धावसंख्येवर संपुष्टात आला. शाहीन शाह आफ्रिदीने पहिल्याच षटकात तंझिन हसनला भोपळाही फोडू न देता पायचीत पकडून पाकिस्तानला सनसनाटी सुरुवात करून दिली. पुढच्याच षटकात त्याने नजमुल होसैन शांटोला (4) उमर मीरकरवी झेलबाद करून बांगलादेशला दुसरा धक्का दिला. या दोन धक्क्यांनंतर बांगलादेशची फलंदाजी शेवटपर्यंत बहरली नाही. सलामीवीर लिटन दासने 64 चेंडूंत 6 चौकारांसह 45 धावांची खेळी केली. मधल्या फळीत महमुदुल्लाह (56), कर्णधार शाकीब अल हसन (43) व खाली मेहदी हसन (25) यांनी उपयुक्त फलंदाजी केली म्हणून बांगलादेशला दोनशे धावांचा टप्पा ओलांडता आला. पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदी व मोहम्मद वसीम यांनी 3-3 फलंदाज बाद केले. हारिस रौफला 2, तर इफ्तीखार अहमद व उस्मान मीर यांना 1-1 बळी मिळाला.

शाहीन शाह आफ्रिदीचा विक्रम

शाहीन शाह आफ्रिदीने बांगलादेशविरुद्ध पहिला बळी टिपताच विश्वविक्रम केला. शाहीनने तंजीम अहमदला बाद करत एकदिवसीय क्रिकेटमध्ये बळींचे शतक पूर्ण केले. याचबरोबर तो वन-डे फॉरमॅटमध्ये सर्वात जलद 100 बळी घेणारा गोलंदाज ठरला. याबाबतीत आफ्रिदीने मिचेल स्टार्कचा विश्वविक्रम मोडला. आफ्रिदीने 51 व्या सामन्यात 100 एकदिवसीय बळींचा आकडा पूर्ण केल्या, तर मिचेलने हे शतक झळकवण्यासाठी 52सामने खेळला होता.