
सामना ऑनलाईन। इस्लामाबाद
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरला ‘जागतिक दहशतवादी’ घोषित केल्यानंतर पाकिस्तानने त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्याला प्रवासबंदीही लागू केली आहे. पाकिस्तानने मसूदवर शस्त्रास्त्र आणि दारूगोळ्याची खरेदी-विक्री करण्यावरही प्रतिबंध लादले आहेत.
संयुक्त राष्ट्रांच्या इसिस आणि अल कायदा निर्बंध समितीने बुधवारी संध्याकाळी मसूद अझरला जागतिक दहशतवादी घोषित केले. जैशने कश्मीरमधील पुलवामा येथे घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यात हिंदुस्थानचे 40 जवान शहीद झाले होते. त्यानंतर हिंदुस्थान -पाकिस्तानमध्ये युद्धाच्या स्थितीपर्यंत तणाव निर्माण झाला होता. मसूदविरोधात निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश पाकिस्तान सरकारने अधिकाऱयांना दिले आहेत. अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्सने मांडलेल्या प्रस्तावाला चीननेही पाठिंबा दिल्यानंतर अझरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा मार्ग मोकळा झाला.
पुलवामा हल्ल्यानंतर काही दिवसांतच फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिकेने अझरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या अल कायदा निर्बंध समितीमध्ये प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील 15 देशांमध्ये व्हेटो अधिकार असलेल्या चीनने आपला विशेषाधिकार वापरून अझरविरोधातील प्रस्ताव रोखला होता, पण अखेर आंतरराष्ट्रीय दबावापुढे नमते घेत चीनला माघार घ्यावी लागली आहे.




























































