
सामना ऑनलाईन । इस्लामाबाद
पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटाशी सामना करत आहे. त्यासाठी सरकारने कमीतकमी खर्च करण्याचे आवाहन विविध सरकारी संस्थांना केले आहे. खर्च कमी करण्यासाठी सरकारने मोहीमही सुरू केली आहे. देश आर्थिक संकाटाशी मुकाबला करत असताना पाकिस्तानी लष्कराने स्वेच्छेने लष्करी खर्चात कपात करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आगामी अर्थसंकल्पात लष्करी खर्चात कपात करण्यात येणार असल्याची माहिती इंटर सर्विसेस पब्लिक रिलेशनचे (आयएसपीआर) महासंचालक मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. लष्करी खर्चात कपात करण्यात येणार असली तरी देशाच्या सुरक्षेशी कोणताही समझौता करण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानी लष्कराने घेतलेल्या खर्चाच्या कपातीच्या निर्णयाचे पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी कौतुक केले आहे. लष्कराने घेतलेला हा अभूतपूर्व आणि महत्त्वाचा निर्णय आहे. त्यांचा हा निर्णय कौतुक करण्यासारखा आहे, असे ते म्हणाले. देश सध्या आर्थिक संकटाचा सामना करत असल्याने एका वर्षासाठी आम्ही लष्करी खर्चात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. लष्करी खर्चात कपात करण्यात येत असली तरी देशाच्या सुरक्षेशी कोणताही समझौता करण्यात येणार नाही, असेही गफूर यांनी स्पष्ट केले आहे. देशाच्या सुरक्षेसाठी लष्कर सज्ज असल्याचे ते म्हणाले. बलूचिस्तान आणि इतर दूर्गम भागातील दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठीही लष्कर सक्षम असल्याचे त्यांनी सांगितले.
लष्करी खर्चात कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी नेमकी किती कपात करण्यात येणार आहे, ते लष्कराने स्पष्ट केलेले नाही. याबाबतची माहिती सर्वजनिक करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. देशासमोरील आर्थिक संकट लक्षात घेता हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे. सुरक्षा दलासमोर अनेक आव्हाने असतानाही त्यांनी घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद असल्याचे इमरान खान यांनी म्हटले आहे. पाकिस्तानचे विज्ञान आणि तंत्रज्ञानमंत्री फवाद चौधरी यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. देशातील सर्व संस्थाच्या अशाच प्रकारच्या सहकार्याने देश या संकटातून बाहेर पडेल असा विश्वास चौधरी यांनी व्यक्त केला आहे.






























































