
इंदूर पोलिसांची अधिकृत वेबसाईट हॅक झाली आहे. हॅकरने डीजीपीनंतर अॅडिशनल एसपी आणि झोन 2 च्या सर्व अधिकाऱ्यांच्या नावापुढे ‘हॅक्ड बाय मोहम्मद बिलाल’ असे लिहिले. तसेच फ्री कश्मीर आणि पाकिस्तान झिंदाबादचे बोर्डही झळकावले. यासह डीजीपी आणि आयजींच्या प्रोफाईलच्या जागी हिंदुस्थानची शान असलेला तिरंगा चुकीच्या पद्धतीने लावला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही अश्लाघ्य भाषेत टिप्पणी केली. हॅकरने केलेल्या या खोडसळपणामुळे खळबळ उडाली आहे.
याआधी सोमवारी मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी संपूर्ण राज्यात रेड अलर्ट जारी केली होता. यानंतरही हॅकरने पोलिसांची वेबसाईट हॅक केली. हॅकिंगच्या या घटनेमुळे खळबळ उडाली असून सायबर टीम सक्रीय झाली आहे. वेबसाईट रिकव्हर करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.
दरम्यान, पाकिस्तानी हॅकर मोहम्मद बिलाल याने हिंदुस्थानमधील वेबसाईट हॅक करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या हॅकरने याआधी दिल्ली भाजपाची वेबसाईट हॅक केली होती. नोव्हेंबर 2019 मध्ये दिल्ली भाजपाच्या वेबसाईटवर फ्री कश्मीर आणि पाकिस्तान झिंदाबादचे लिहिण्यात आले होते. तसेच, 27 फेब्रुवारी आठवतेय ना. यासह एप्रिल 2018 ला आंध्र विद्यापीठाची वेबसाईटही बिलालने हॅक केली होती. तसेच 15 ऑक्टोबर, 2018 ला गोवा भाजपची वेबसाईट हॅक झाली होती आणि यातही बिलालचा हात होता.

काय झालं होतं त्या दिवशी?
27 फेब्रुवारीचा संबंध एका दु:खद घटनेशी आहे. यादिवशी गुजरातमधील गोधरा रेल्वे स्टेशनवरील साबरमती एक्सप्रेसमध्ये धर्मांधांनी आग लावली होती. यात अनेकांचा मृत्यू झाला होता. यानंतर गुजरातमध्ये जातीय दंगल उसळली होती.
वेबसाईट केली ब्लॉक
दरम्यान, क्राईम ब्रांचचे अॅडिशनल एसपी गुरू पाराशर यांनी वेबसाईट रिकव्हर करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले. ज्या आयपी अॅड्रेसद्वारे वेबसाईट हॅक करण्यात आली तो ट्रॅक करण्याचे काम सुरू असून सध्या वेबसाईट ब्लॉक करण्यात आली आहे.



























































