गर्लफ्रेंडसोबत पळण्याच्या नादात हिंदुस्थानात शिरला, पाकिस्तानी तरुणाला लष्कराने घेतले ताब्यात

पाकिस्तनाचा एक तरुण आपल्या प्रेयसीसोबत पळून जाणार होता. पण तिच्या कुटुंबीयांना घाबरून तो हिंदुस्थानात शिरला आहे. हिंदुस्थानी सैन्याने या तरुणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जगसी कोली हा 21 वर्षीय तरुण पाकिस्तानचा नागरिक आहे. आंतरराष्ट्रीय सीमेपासून 35 किलोमीटरवर पाकिस्तानमध्ये जगसीचे गाव आहे. तर याच सीमेपासून 8 किमीवर त्याच्या प्रेयसीचे गाव आहे. दोघांचे एकमेकांवर प्रेम होतं पण मुलीच्या कुटुंबीयांना या दोघांच नातं मान्य नव्हतं.

जगसी अकरावीत शिकत आहे. तर त्याची प्रेयसी 17 वर्षाची असून ती दुसऱ्या जातीची आहे, म्हणून मुलीच्या कुटुंबीयांनी त्यांच्या नात्याला विरोध केला होता. त्यामुळे दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला होता. पण मुलीच्या कुटुंबीयांनी दोघांना पळून जाताना पकडलं. तेव्हा जगसी तिथून पळून गेला. रात्रीच्या अंधारात जिथे प्रकाश दिसेल तिथे तो पळत होता. असे करत तो राजस्थानमध्ये हिंदुस्थानी सीमेत घुसला. तेव्हा बीएसएफच्या जवानांनी त्याला हटकलं. तेव्हा आपण पाकिस्तानचे नागरिक असल्याचे त्याने सांगितले.

बीएसएफने चौकशी केल्यानंतर त्याच्याकडून काहीच संशयास्पद आढळले नसल्याचे कळाले. आता बीएसएफने जगसीला पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. पोलिस चौकशी करून पुढील कारवाई केली जाईल असे सांगण्यात येत आहे.