
सामना ऑनलाईन। लाहोर
केंद्र सरकारने जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवल्याने पाकिस्तानचं डोकं फिरलं आहे. आपला हा राग शांत करण्यासाठी शहरात उभारण्यात आलेल्या हिंदुस्थानी राजांच्या मूर्तींची तोडफोड करण्यास येथील माथेफिरु तरुणांनी सुरूवात केली आहे. 19 व्या शतकात शीख साम्राज्याचे शासक असलेल्या रणजीतसिंह यांच्या लाहोर किल्ल्यातील मूर्तीची तोडफोड करण्यात आली आहे. दोन तरुणांनी हे कृत्य केले असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
हिंदुस्थानने जम्मू-कश्मीरमधून 370 कलम रद्द केल्याने पाकिस्तान चवताळला आहे. 370 कलम हटवून हिंदुस्थानने कश्मीरी नागरिकांवर अत्याचार केला आहे, अशी बोंब पाकिस्तान मारत आहे. याचमुद्द्यावरून विविध देशांची सहानूभूती मिळवण्याचाही प्रयत्न पाकड्यांनी केला. पण कोणीही त्यांना भीक घातली नाही. यामुळे जगभराचे लक्ष वेधण्याचा उद्योग पाकड्यांनी सुरू केला आहे. याचपार्श्वभूमीवर दोन पाकिस्तानी तरुणांनी लाहोर किल्ल्यात दोन महिन्यापूर्वीच जून महिन्यात उभारण्यात आलेली 9 फुटांची महाराजा रणजित सिंह यांच्या मूर्तीची तोडफोड केली. 19 व्या शतकाच्या सुरुवातीला महाराजा रणजित सिंह यांचे जम्मू-कश्मीरबरोबरच पंजाबवर राज्य होते. त्यामुळे समाजकंटंकांनी त्यांच्या मूर्तिलाच लक्ष्य केले. मौलाना खईम यांच्या रिझवी तहरीक-ए-लब्बैकसी या संघटनेशी दोन्ही आरोपी संबंधित आहेत. या घटनेनंतर ईशनिंदा कलमांतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, लाहोर किल्ल्याचे संवर्धन करणाऱ्या कमिटीने ईदनंतर मूर्तीची डागडुजी केली जाईल असे सांगितले आहे. तसेच सध्या हा भाग पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आला आहे.



























































