पालघर नगरपरिषद : शिवसेनेचे संख्याबळ वाढणार, चार अपक्ष स्वगृही परतणार

159

सामना ऑनलाईन । पालघर

पालघर नगरपरिषद निवडणुकीत निवडून आलेले 5 पैकी 4 अपक्ष नगरसेवक शिवसेनेत स्वगृही परतणार आहेत. मंगळवारी चारही अपक्ष नगरसेवक मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

पालघर नगर परिषद: विजयी उमेदवारांच्या नावांची यादी

पालघर नगरपरिषद वार्ड क्रमांक 1 चे अपक्ष नगरसेवक दिनेश पांडुरंग बाबर आणि शेरबानू मुनाफ मेमन, तर वॉर्ड क्रमांक 4 चे अपक्ष नगरसेवक कविता सुरेश जाधव आणि प्रवीण मधुकर मोरे हे मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन स्वगृही परतणार आहेत. त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ वाढणार आहे. नगरपरिषदेमधील शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या 14 वरून 18 वर पोहोचणार आहे, तर एकूण 28 पैकी 25 युतीचे नगरसेवक असणार आहेत.

याआधी सोमवारी झालेल्या मतमोजणीत पालघर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचा झेंडा फडकला. युतीच्या शिलेदारांनी 28 पैकी 21 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला. शिवसेनेचे 14 तर भाजपचे 7 नगरसेवक विजयी झाले. पाच जागांवर अपक्ष निवडून आले होते. याच पाचपैकी चार नगरसेवक शिवसेनेत स्वगृही परतणार आहेत.

दरम्यान, या निवडणुकीमध्ये शिवसेना-भाजपसह राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक निवडून आले, मनसे, काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडीला भोपळाही फोडता आला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या