
फलटण तालुक्यातील वाखरी येथील यात्रेच्या पंच कमिटीने गावातील विद्यमान सर्व ग्रामपंचायत सदस्यांसह दोनशेहून अधिक ग्रामस्थांना यात्रेत सहभागी करून घेण्यास नकार दिला आहे. वाळीत टाकल्यामुळे त्यांच्याकडून वर्गणी घेणार नसल्याचे पंच कमिटीने सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी उद्या (दि. 14) प्रांत कार्यालयाबाहेर उपोषणाचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.
वाखरी गावातील भैरवनाथाची यात्रा 23 एप्रिलपासून सुरू होणार असून, पाच दिवस यात्रा भरते; परंतु 20 वर्षांहून अधिक काळापासून यात्रेच्या पंच कमिटीने गावातील अनेक ग्रामस्थांची वर्गणी घेण्यास नकार दिला आहे. या ग्रामस्थांना यात्रेत सहभागी करून घेतले जात नसून, ‘आम्ही तुम्हाला वाळीत टाकले आहे, आम्ही तुमची वर्गणी घेणार नाही, तसेच जत्रेत तुम्हाला सहभागी होता येणार नाही, आलात तर तुम्हाला बघून घेऊ’, असा इशारा पंच कमिटी देत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे सर्व विद्यमान सदस्य, सरपंच, उपसरपंचांसह दोनशेहून अधिक ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, प्रांताधिकाऱ्यांकडे धाव घेत निवेदन दिले आहे. दरम्यान, प्रशासनाने दखल न घेतल्याने उद्यापासून प्रांत कार्यालयाच्या बाहेर साखळी उपोषणास बसण्याचा इशारा वाखरी ग्रामस्थांनी दिला आहे.
या निवेदनावर सरपंच शुभांगी शिंदे, उपसरपंच अक्षय जाधव यांच्यासह दोनशेहून अधिक ग्रामस्थांच्या सह्या आहेत.
गेल्या 20 वर्षांहून अधिक काळ झाला, जत्रेमध्ये बहुसंख्य ग्रामस्थांना वाळीत टाकण्याचा प्रकार सुरू आहे. दरवर्षी वर्गणी देण्याचा ग्रामस्थ प्रयत्न करतात. मात्र, यात्रा पंच कमिटी सहभागी करून घेत नाही. या वेळी सहभागी करून न घेतल्यास मानवी हक्क आयोगाकडे यात्रा कमिटी आणि प्रशासनाविरोधात तक्रार करणार आहे.
– शुभांगी शिंदे, सरपंच, वाखरी
वाखरी गावात जुनी जत्रा कमिटी आणि काही ग्रामस्थांमध्ये वाद आहेत. दोन्ही बाजूंना आम्ही समजावून सांगत आहोत. त्यांची बैठकही घेतली आहे. नवीन यात्रा कमिटी नेमून सर्वांना सामावून घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. पोलीसही त्यांच्या पद्धतीने समजावून सांगत आहेत.
– डॉ. शिवाजी जगताप, प्रांताधिकारी, फलटण.




























































