ग्यानबा-तुकारामांच्या नामघोषाने पंढरीनगरी दुमदुमली; आषाढीच्या सोहळय़ासाठी 10 लाख वारकरी दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा असे मागणे मागत गेल्या 19 दिवसांपासून पायी निघालेला वैष्णवांचा मेळा पंढरीत दाखल होत आहे. उद्या रविवारी आषाढी एकादशी असून या सोहळय़ासाठी तब्बल दहा लाख वारकरी पंढरीनगरीत येतील असा अंदाज आहे.

शुक्रवारी दुपारपासून वरुणराजाची संततधार सुरू झाली आहे. भक्तिरसात चिंब झालेले लाखो वारकरी पाऊस अंगावर झेलत, चिखल तुडवत ग्यानबा-तुकारामांचा जयघोष करीत पंढरीत दाखल होत आहेत. पावसामुळे तारांबळ होत असली तरी उत्साह मात्र कायम आहे. कोरोनाच्या आपत्तीमुळे दोन वर्षांनंतर वारीचा सोहळा होत असल्याने वारकऱयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या आठवडाभरापासून पंढरीनगरी वारकऱयांच्या गर्दीने फुलून गेली असून, टाळ-मृदंगांच्या ठेक्यावर गगनाला गवसणी घालणारा विठूमाऊलीचा गजर कानांवर पडतो आहे. एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे करणार आहेत.