
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांना श्री विठोबाच्या दर्शनासाठी ऑनलाईन बुकींग करावे लागत होते ते यापुढे करावे लागणार नाही. केवळ आधारकार्ड दाखवून विठोबाचे दर्शन मिळणार आहे. तसेच संक्रातीदिवशी मंदिरात रूक्मिणीमातेचा वाणवसा करण्यास बंदी असेल. पण केवळ महिलांना संध्याकाळी आधारकार्ड दाखवत कोरोनाचे नियम पाळून दर्शन देण्याचा निर्णय मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आले असल्याचे समितीचे कार्यकारी अधिकारी विठठल जोशी यांनी सांगितले.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणा-या विठुमाउलींचे दर्शन आता 20 जानेवारीपासून ऑनलाईन बुकींगविना केवळ आधारकार्ड दाखवून भक्तांना मिळणार आहे. सद्य स्थितीत प्रतिदिन 4 हजार 800 भाविक विठोबाची दर्शन घेतात. या दर्शनाच्या भाविकांची मर्यादा 19 जानेवारीपर्यत तब्बल आठ हजारापर्यत वाढवण्यात आली आहे.
शिवाय यंदा संक्रातीला महिलांना वाणवसा करता येणार नाही. पण संक्राती दिवशी सायंकाळी 5 वाजलेपासून 9 वाजेपर्यत महिलांना केवळ आधारकार्ड दाखवत विठोबा अन रूक्मिणी मातेचे दर्शन हे कोरोनाचे सर्व प्रतिबंधात्मक नियम पाळून करता येणार आहे. मात्र 60 वर्षे वयावरील आणि 10 वर्षे खालील भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.



























































