
सामना प्रतिनिधी, नागपूर
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज विधानसभा व विधान परिषदेत दिवंगत सदस्यांना श्रद्धांजली वाहून दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले. विधिमंडळाचे दिवंगत सदस्य पांडुरंग फुंडकर यांच्या भाषणाचे पुस्तक लवकरच विधिमंडळामार्फत प्रकाशित करण्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली तर विधान परिषदेत परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी फुंडकर हे शेतकऱ्याचे सच्चे मित्र होते, अशा शब्दांत श्रद्धांजली वाहिली.
विधानसभेत तसेच विधान परिषदेत कृषिमंत्री दिवंगत पांडुरंग फुंडकर यांच्यासह भाई वैद्य, बापूराव पानघाटे, दगडू बडेपाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, गणपतराव देशमुख, संजीव रेड्डी, अनिल गोटे, एकनाथ खडसे, दीपिका चव्हाण, जिवा पांडू गावीत, शशिकांत खेडेकर यांनीही श्रद्धांजली अर्पण केली.
































































