
सामना प्रतिनिधी । मुंबई
गेल्या वर्षी चेंगराचेंगरीत काळवंडलेल्या आणि अनेक वर्षांपासून रखडलेल्या परळ टर्मिनसचे काम आज खऱ्या अर्थाने मार्गस्थ झाले. परळ टर्मिनसच्या कामाचा एक भाग असलेला नवा फलाट आजपासून सुरू करण्यात आला आहे. परळ स्थानकाच्या फलाटावरील गर्दीला विभागणारा हा नवा डाऊन दिशेचा कल्याणकडे जाणारा नवा प्लॅटफॉर्म रविवारच्या मेगाब्लॉकनंतर प्रवाशांसाठी सुरू झाला. त्यामुळे प्रवाशांची होणारी कोंडी कमी होणार आहे.
नव्या प्लॅटफॉर्ममुळे परळच्या एकाच आयलॅण्ड प्लॅटफार्मवर होणारी गर्दी कमी होण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे. मध्य रेल्वेने रविवारी आठ तासांचा विशेष मेगाब्लॉक घेत नवीन विस्तीर्ण फलाट उपलब्ध करून दिला आहे. या नवीन फलाटामुळे सध्याचा फलाट क्रमांक एक तात्पुरता बंद होणार असला तरी अप दिशेचा सीएसएमटीला जाणारा मार्ग क्र. २ मात्र चालू राहणार आहे. परळ टर्मिनसचे काम पूर्ण झाल्यानंतर जुना फलाट क्र. १ परळ लोकल चालविण्यासाठी उपयोगी येणार आहे. या फलाटाच्या कामासाठी आठ तासांचा घेतलेला विशेष मेगाब्लॉक तासभर लांबला असला तरी नवा फलाट उपलब्ध झाला.
नवीन फलाट असला तरी जुन्या अरुंद जिन्याचाच वापर!
नकीन मार्गिका सुरू झाली तरीही परळच्या प्रवाशांना सध्या अरुंद पुलावरूनच प्रवास करावा लागणार आहे. पादचारी पूल जोडण्यासाठी पायऱ्या उपलब्ध नसल्याने जुन्या फलाटावरून नव्या फलाटावर जाण्यासाठी तीन ठिकाणी स्वतंत्र रॅम्प उभारण्यात आले आहेत. पुढील सहा महिन्यांत परळ टर्मिनस पूर्ण झाल्यानंतर ही मार्गिका बंद करून पुन्हा ही काहतूक प्लॅटफॉर्म क्रमांक एककरून सुरू केली जाईल. हा दुसरा टप्पा असून त्यात परळ टर्मिनस स्वतंत्रपणे सुरू होणार असून जुन्या प्लॅटफॉर्मची रुंदी दोन मीटरने वाढवली जाईल. महत्वाचे म्हणजे सीएसएमटीप्रमाणे या स्थानकातही लोकलच्या दोन्ही बाजूंनी चढउतार शक्य होणार आहे.






























































