मनतरंग – भास-आभास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिव्या नेरुरकर-सौदागर

पॅरॉनॉईड स्किझोफ्रेनिया हा गंभीर असा मानसिक आजार आहे ज्याच्यावर नियमित औषधोपचार आणि समुपदेशनाद्वारे नियंत्रण ठेवता येते. हा आजार पूर्णपणे बरा होत नाही. पण त्यासाठी या आजाराचा स्वीकार आजारी असलेल्या व्यक्तीच्या घरच्यांनी करणे गरजेचे असते. तरच या आजारावर नियंत्रण शक्य आहे. भास-आभासाच्या या खेळात ही व्यक्ती कधी त्या खेळाला खरे मानून चालते हे तिचे तिलाच समजत नाही.

ही गोष्ट आहे एका सधन अशा कुटुंबाची. हे कुटुंब चार जणांचं होतं. आई गृहिणी तर वडील एका खासगी कंपनीत उच्च पदावर कार्यरत होते. त्यांची दोन्ही मुलंही उच्चशिक्षण घेत होती. त्यापैकी मोठय़ा मुलाचे शिक्षण जवळपास होत आले होते. धाकटय़ा मुलाचे, वरुणचे (नाव बदलले आहे) इंजिनिअरिंगचे शिक्षण चालू होते. वरुण हा हुशार आणि एकपाठी होता. त्याची सगळ्या बाबतीत जिज्ञासाही भरपूर असायची. पुस्तके हा त्याचा ‘वीक पॉइंट’ होता. दिवसभर तो कुठले ना कुठले पुस्तक वाचायचाच. वरुणला एअरोस्पेस इंजिनिअरिंग करायचे होते. मात्र तरीही त्याला समुपदेशनासाठी आणावे लागले होते. त्या दिवशी वरुणचे वडील त्याला घेऊन आले होते. तो केबिनबाहेर बसला होता. सुरुवातीला स्वतची जुजबी ओळख करून देत त्यांनी सांगायला सुरुवात केली.

‘मॅडम…!’ एक मोठा पॉज घेत ते पुढे म्हणाले,  “आमचा वरुण हल्ली अभ्यासच करत नाहीये. त्याचं लक्ष अभ्यासातून पूर्ण उडालं आहे. त्याला आता बिझनेस करायचा आहे. दुसरं एक सांगायचं म्हणजे त्याच्या खोलीतला दिवा जवळजवळ रात्रभर जळत असतो. बरं त्याचं दार ठोकावावं तर तो आम्हाला आत येऊ देत नाही. कधी कधी रात्री बाल्कनीतही डोळे बंद करून आणि लॅपटॉप हातात धरून उभा असतो. माझी किंवा पत्नीची चाहूल लागली की लगेच आतमध्ये जातो. त्याच्याशी जरा बोलाल का?”

इंजिनिअरिंग किंवा मेडिकलच्या वर्षाला असणारी मुलं ही सतत अभ्यास करून कंटाळतात आणि पालक समुपदेशनासाठी अशा वेळेस त्यांच्या मुलांना मार्गदर्शनासाठी घेऊन येतात असा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. वरुणलाही तशाच मार्गदर्शनासाठी आणले असेल ही अटकळ मी बांधली. मात्र त्याचे एकटय़ानेच बाल्कनीत उभे असणे, आकाशाकडे बघणे हे काहीतरी वेगळेच असल्याचे जाणवले. पण याबद्दल त्याच्याशीच बोलणे गरजेचे होते.

वरुण समोर हसतमुखानेच येऊन बसला आणि त्याने स्वतच स्वतबद्दल बोलायला सुरुवात केली. “मॅम; मी वरुण. मला आता खरंच अभ्यास नकोसा वाटतो. त्याऐवजी मला स्वतचा बिझनेस करायला आवडेल. माझ्या काही आयडियाज आहेत. प्लॅन्सही आहेत. फक्त अप्रुवलची त्यांच्याकडून वाट बघतोय.” ‘म्हणजे बाबांकडूनच ना?’ असं त्याला विचारताच त्याने ‘छे! छे’ म्हणत हात झटकले. ‘मग रे कोण?’ ह्यावर बोलताना त्याच्या नजरेत एक वेगळीच चमक आल्याचे जाणवले.

 ‘मॅम, कोणाला बोलू नका. माझ्या पॅरेन्टस्ना तर नाहीच. मी रात्री एलियन्सशी माझे प्लॅन्स डिस्कस् करत असतो. त्यांनीच मला समजावलंय की इंजिनिअरिंग करून काय होणार? त्यापेक्षा बिझनेस करून मोठा व्हायला सांगितलं आहे.” वरुणला मी शुभेच्छा दिल्या आणि त्याला त्याच्या प्लॅनवर विचार करण्याकरिता म्हणून केबिनबाहेर बसायला सांगितले. त्याच्या वडिलांना परत आत बोलवून त्याची माहिती करून घेतली. वरुणला काय झाले असावे याची कल्पना आता आली होतीच.

त्याच्या वडिलांच्या म्हणण्यानुसार वरुण हा लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि मितभाषी होता. त्याला मित्रपरिवार नव्हताच. अजूनही त्याचे मित्र कमीच होते. याचे त्यांना कारण विचारल्यावर ते पटकन म्हणाले – “त्याला असे वाटते की मित्र त्याच्यावर जळतात. त्याच्याबद्दल त्यांना इनसिक्युरिटी वाटते. म्हणून तो नाही जास्त मित्र बनवत. आम्हाला एकच माहिती आहे. आमचा वरुण अतिशय बुद्धिमान आहे.” त्यांच्या बोलण्यातून त्याच्याविषयी कौतुक ओसंडून वाहत होतं.

‘पण, त्याच्या रात्रीच्या जागण्याबद्दल कधी त्याला विचारलंत का?’ असा त्यांना प्रश्न केल्यावर ते हसत हसत म्हणाले – “विचारलं त्याला. तर पठ्ठा म्हणतो कसा? बाबा मला आणि माझ्या सुपरपॉवरला डिस्टर्ब नका करू. रात्री माझ्यामध्ये डिवाईन पॉवर्स असतात.” त्यांच्या बोलण्यात अजूनही त्याच्याविषयी कौतुकच होतं.

वरुणच्या वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे त्याला य्य्य्या डिवाईन पॉवर्स गेली दोन वर्षं येत होत्या. त्यांचे आपल्या मुलाबद्दलचे कौतुक त्या मुलासाठी किती नुकसानकारक ठरले होते याची प्रचीती त्यांना वरुणच्या काही मानसिक चाचण्या आणि त्याच्यावर ताबडतोब सुरू करण्यात आलेले औषधोपचार यामुळे आली.

वरुणला ‘पॅरॉनॉईड स्किझोफ्रेनिया’ नावाचा मानसिक आजार झाला होता आणि अंदाजे गेली चार-पाच वर्षे तो या आजाराशी झुंज देत होता. सुरुवातीला वरुणचे पालक ही वस्तुस्थिती मान्य करायला तयारच नव्हते. त्याच्या आजाराचा अंदाज त्यांच्या कानावर घालताच त्यांनी समुपदेशनास येणे बंद केले होते. मग काही दिवसांनी वरुणने पुन्हा त्याच प्रकाराची पुनरावृत्ती केल्यावर त्यांना या आजाराचे गांभीर्य लक्षात आले आणि त्यांनी औषधोपचार घेण्यास सुरुवात केली.

पॅरॉनॉईड स्किझोफ्रेनिया हा गंभीर असा मानसिक आजार आहे ज्याच्यावर नियमित औषधोपचार आणि समुपदेशनाद्वारे नियंत्रण ठेवता येते. हा आजार पूर्णपणे बरा होत नाही. पण त्यासाठी या आजाराचा स्वीकार आजारी असलेल्या व्यक्तीच्या घरच्यांनी करणे गरजेचे असते. तरच या आजारावर नियंत्रण शक्य आहे. भास-आभासाच्या या खेळात ही व्यक्ती कधी त्या खेळाला खरे मानून चालते हे तिचे तिलाच समजत नाही. मग संशय, एकटेपण, नैराश्य किंवा या सर्व लक्षणांच्या जोडीला पराकोटीचा उत्साह अशी ढोबळमानाने या आजाराची लक्षणे आहेत.

हा आजार म्हणजे करणी, भूतबाधा, पूर्वजन्मीचे पाप किंवा नजर लागण्याचा प्रकार नसून एक मानसिक आजार आहे ज्यामध्ये मेंदूमधील काही रसायनांच्या अभावामुळे व्यक्तीच्या विचार आणि भावनांवर परिणाम होतोच, शिवाय त्या व्यक्तीची सारासार विचार करण्याची क्षमता नष्ट होते (ही सर्वसाधारण लक्षणे पॅरॉनॉईड स्किझोफ्रेनियाची आहेत. मात्र सरसकट सगळ्याच रुग्णांना लागू होतीलच असे नाही.).

वरुण आता नियमित उपचार घेत होता. त्याच वेळेस त्याच्या पालकांची समुपदेशन प्रािढया सुरू झाली होती. त्याच्या आईला हा आघात सहन होत नव्हता. तिच्यामध्ये नैराश्य येत चालले होते. त्याच्या वडिलांचीही थोडय़ाफार फरकाने हीच स्थिती होती. वरुणच्या अशा अवस्थेसाठी ते स्वतला दोष देत होते. तूर्तास, त्यांना उपचार पद्धतींची माहिती देण्याचे काम आणि त्यांच्यासोबत असण्याचे काम समुपदेशन करत होते. निश्चितच याचा सकारात्मक परिणाम त्यांना लवकरच दिसणार होता.

(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत)

[email protected]