
सध्या रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट पुढील 5 दिवस वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे या घाटातील दरड खाली कोसळली आहे. हा घाट धोकादायक स्थितीत असल्याने प्रशासनाने योग्य ती खबदारी घेतली असून 5 दिवस घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या घाटाची पाहणी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केली.
चौपदरीकरणाच्या कामात या घाटातील डोंगर कटाई करण्यात आली होती. झाडांची कटाई केलेला डोंगर आणि या डोंगराला वरील बाजूला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे हा डोंगर कधीही खाली येऊ शकतो. त्यामुळे कालच्या पावसानंतर परशुराम घाट अजूनही वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. दरम्यान, खासदार विनायक राऊत यांनी या घाटाची पाहाणी केली. ठेकेदाराला ज्या मुदतीत काम पूर्ण करायला सांगितले होते ते झालेले नाही. त्यामुळे डोंगरावरील परशुराम गाव आणि वस्तीतील घरांना धोका निर्माण झाल्याचे राऊत म्हणाले. गावातील रहिवाशांना प्रशासनाने योग्य त्या सूचना दिल्या असल्याचे राऊत यांनी सांगितले.




























































