जिंतूरची अंजली कोला-पोर्जे मिसेस एशिया युनिव्हर्स

जिंतूर शहरातील एका सामान्य कुटुंबातील लेक अंजली संपत कोला-पोर्जे हिने मेहनतीला आपले कर्म मानून राजस्थानमधील जयपूर येथे आयोजित मिसेस युनिव्हर्स प्रा.लि. तर्फे ब्युटी पेजंट या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या पाचव्या श्रेणीत जगभरातून आलेल्या 60 विवाहित महिलांमध्ये अव्वल स्थान पटकावून ‘मिसेस एशिया युनिव्हर्स 2021 च्या किताबाचा क्राऊन माथी सजवून घेण्यात यश प्राप्त केल्याने संबंध एशियामध्ये जिंतूर तालुक्याच्या नावलौकिकात अंजलीने पुनश्च एकदा मनाचा तुरा रोवला आहे.

शहरातील एकलव्य बालविद्या मंदिर विद्यालयात शालेय व ज्ञानोपासक महाविद्यालयात उच्चमाध्यमिक तर संभाजीनगर येथे उच्च शिक्षण ग्रहण करणार्‍या सामान्य कुटुंबातील अंजली कोला-पोर्जे हिला शालेय जीवनापासूनच फॅशन जगाचे आकर्षण होते. मात्र 2009 साली तिचे लग्न संभाजीनगर येथील इलेक्ट्रिकल इंजिनिअर संपत पोर्जे यांच्यासोबत झाल्यानंतर तिच्या स्वप्नांना पंख फुटण्यास सुरुवात झाला. अन वयाच्या 21 व्या वर्षीपासून मॉडेलिंग फॅशन, गु्रमिंग ट्रेनर आणि इव्हेन्टच्या क्षेत्रात तिने प्रत्येक्षात पदार्पण करून संभाजीनगर, पुणे, मुंबई, नाशिक आदी ठिकाणी ५० पेक्षा जास्त वेळेस ब्युटी पिजंट स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून यशस्वी भूमिका निभावून अवघे फॅशनच्या विश्वात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्याचबरोबर ई टीव्ही मराठी वाहिनीवरील ‘मेजवानी किचन क्वीन’ व ‘आम्ही सारे खवय्ये सारखे रियालिटी शोच्या किताबावर आपल्या नावाचा शिक्कामोर्तब केला. तसेच तिच्या अद्वितीय कार्याची दखल घेऊन अभिनेता अमन शर्मा यांच्या हस्ते इंटरप्रेन्युअर वुमन्स अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इथेच न थांबता अंजलीने प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर आणि मेहनतीला आपले कर्म मानून सलग 8 महिने प्रयत्नांची पराकाष्ठा ओलांडून राजस्थानमधील जयपूर येथे आयोजित मिसेस युनिव्हर्स प्रा.लि. तर्फे ब्युटी पिजंट या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदविण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून स्पर्धेत आपले नाव निश्चित केले. मिसेस युनिव्हर्सच्या पाचव्या श्रेणीत जगभरातून 60 विवाहित महिलांनी सहभाग नोंदविला होता. या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या ग्रँड फिनालेसाठी 5 महिलांची निवड करण्यात आली होती. शेवटी अंजलीने या स्पर्धेत अब्बल स्थान पटकावून ‘मिसेस एशिया युनिव्हर्स 2021′ च्या किताबाचा क्राऊन माथी सजवून घेण्यात यश प्राप्त केले. तिच्या या अद्वितीय यशामुळे संबंध एशियामध्ये जिंतूर तालुक्याच्या नावलौकिकात आणखीन एक मनाचा तुरा रोवला गेला आहे.

विवाहित महिलांच्या इच्छा आकांक्षाना बळ देणार

विवाहित जीवनामध्ये महिलांना असंख्य कौटुंबिक जबाबदार्‍या पार पाडाव्या लागतात. यामुळे इच्छा असतांना त्यांच्यामधील विविध कला कोशल्य कौटुंबिक बंधनामुळे जागच्या जागीच दबून जातात. परिणामी त्या-त्या क्षेत्राला कर्तुत्ववान महिलांपासून वंचित रहावे लागते. ही एक भारतीय संस्कृतीसाठी एक खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणून उराशी अशा इच्छा आकांशा असणार्‍या महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांच्यामधील कला कोशल्याला बळ देण्याचा काम हाती घेणार असल्याचे मनोधैर्य मिसेस एशिया युनिव्हर्स अंजली कोला-पोर्जे यांनी व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या