
सामना प्रतिनिधी । सेलू
परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची सेलू येथील शाखा शनिवारी पहाटे 4 वाजता चोरट्यांनी फोडली. चोरट्यांनी या बँकेतून सुमारे साडेएकोणीस लाखांची रोकड पळविली. तोंडावर कपडे बांधून आलेले चोरटे सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.
शनिवारी पहाटे 4 वाजेण्याच्या सुमारास चोरट्यांनी बँकेच्या मुख्य दाराचे कुलूप तोडले. चोरट्यांनी या दरोड्यासाठी एका चारचाकी वाहनाचा वापर केल्याची माहिती मिळाली आहे. बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे दिसत असून त्यांचा चेहरा कपड्याने झाकलेला आहे. या चोरीत 2 ते 3 चोरटे सामील झाले होते. चोरट्यांनी बँकेच्या मागील भागातून बँकेत शिरण्याचा प्रयत्न केला. परंतु दरवाजा तुटत नसल्याने चोरटे मुख्य दाराचे कुलूप तोडून बँकेत शिरले. बँकेतील सहा फूटांची तिजोरी आडवी पाडून चोरट्यांनी त्यातून 19 लाख 82 हजार 174 रुपयांची रोकड आणि साडे सात हजार रुपये किंमतीचे इंटरनेटचे मोडेम चोरून नेले. बँकेचे शाखा व्यवस्थापक भागवत काळे सकाळी 8 वाजता बँकेत आल्यानंतर हा प्रकार त्यांच्या लक्षात आला. लगेचच त्यांनी बँकेच्या वरिष्ठांना याबाबत कळविले. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रेणुका वागळे, स्था.गु.शा.चे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, पोलीस निरीक्षक संदीपान शेळके आदींनी घटनास्थळी भेट दिली. शाखा व्यवस्थापकांनी सेलू पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दाखल केली. या चोरीत चोरट्यांनी वापरलेली चारचाकी गाडी जप्त केल्याची माहिती मिळाली आहे. तपासासाठी पोलिसांनी तीन पथक स्थापन केले आहेत. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
जिल्ह्यातील मोठी बँक असतांना बँकेची सुरक्षा व्यवस्था इतकी कमजोर का आहे? बँकेला सुरक्षा रक्षक का नाहीत? तसेच बँकेत अलार्म का नाही? बँकेत अलार्म असता तर बँकेच्या कुलुपाला हात लावताच आवाज झाला असता आणि चोरटे पसार झाले असते. तसेच ज्या ठिकाणी तिजोरी ठेवलेली आहे, त्याच्या समोरच कपाट ठेवलेले असल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यात तिजोरी थेट येत नाही. कपाटाच्या पाठीमागे तिजोरी असल्याने थेट तिजोरीवर कॅमेरा लावलेला नाही. एवढी मोठी रक्कम बँकेत नेहमी असते मग सुरक्षा व्यवस्था इतकी कमजोर का? असे अनेक सवाल उपस्थित करण्यात येत आहे.




























































