केंद्राच्या पथकाचा ताफा अडवला, परभणीत शेतकऱ्यांचा संताप

36

सामना ऑनलाईन,परभणी

परभणी जिह्यातील गंभीर दुष्काळ असलेल्या परभणी, मानवत आणि सेलू या तीन तालुक्यांतील गावांची पाहणी करण्यासाठी ,परभणी जिह्यात दुष्काळ पाहणी पथकाकडे नजरा लागलेल्या असताना ऐनवेळी परभणी तालुक्यातील पेडगाव येथील दौरा या पथकाने रद्द करताच संतप्त शेतकऱ्यांनी या पथकाच्या गाडय़ा अडवून हा दौरा करण्यास त्यांना भाग पाडले. अखेर दुष्काळ पाहणी पथकाने नरमाईची भूमिका बजावत पेडगावची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
केंद्रीय दुष्काळी पथकाच्या दौऱ्यातून परभणी तालुक्यातील पेडगाव हे रद्द करण्यात आले असल्याचे सोशल मीडियावरून समजताच,मानवत तालुक्यातील रुढी फाटय़ावर या पथकातील अधिकाऱ्यांच्या गाडय़ा शेतकऱ्यांनी अक्षरशः अडविल्या तेव्हा अधिकारी नरमल्याने या पथकाने पेडगावत जाऊन जी ओसाड परिस्थिती निर्माण झाली आहे तिची पाहणी केली. उपस्थित शेतकऱ्यांनी या पथकास दुष्काळाच्या झळाबाबतच्या व्यथा मांडल्या. यंदाची रब्बीची पेरणी सुद्धा झाली नाही. दिवसेंदिवस पाणीपातळी खोल-खोल जात आहे. जिह्यात यंदा पहिल्यांदाच गव्हाची पेरणी बहुतांश भागात झालीच नसल्याची यावेळी पथकास माहिती देण्यात आली. पिण्याच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असून, शासनाने दुष्काळ जाहीर केला पण अद्याप कोणतीही मदत मिळालीच नसल्याचे सांगितले.
जिह्यातील शेतकऱ्यांशी मराठकाडय़ातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने परभणी जिल्हयातिल सेलू तालुक्यातील गणेशपूर, परभणी तालुक्यातील पेडगाक व मानकत तालुक्यातील रुढी या गावांना भेटी दिल्या. भेटीदरम्यान त्यांनी शेतीतील नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला व शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. मराठवाडय़ातील दुष्काळी जिह्यांचा दौरा पूर्ण होताच पाहणी दौऱ्याचा अहवाल केंद्राकडे सुपूर्द केला जाणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या