परभणी – भाजप नेत्यांविरोधात जनतेत रोष कायम; बावनकुळेंना दाखवले काळे झेंडे, ताफा अडवण्याचाही प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वादग्रस्त विधानं करणाऱ्या भाजप नेत्यांविरोधात आता जनता चांगलीच संतप्त झाली असून जागोजागी भाजपच्या नेत्यांना अडवून जाब विचारण्यात येत आहे. यामुळे भाजप चांगलीच अडचणीत आली आहे. परभणीत मंगळवारी असंच दृश्य पाहायला मिळालं.

भाजप नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी परभणीत आंबेडकरी संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. भाजपच्या वादग्रस्त विधानं करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करा अशी मागणी करत आंदोलकांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. परभणीत भाजपच्या बैठका सुरू आहेत. यानंतर पत्रकार परिषद ओटोपून वसमत रोडकडे जात असताना वसंतराव नाईक पुतळ्याजवळ आंदोलकांनी बावनकुळे यांचा ताफा अडवून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांनी जमावाला आवारण्याचा प्रयत्न केला आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचा ताफा तिथून पुढे निघाला. मात्र वाचाळ नेत्यांवर योग्य कारवाई न केल्यास भाजपसाठी मोठी अडचण होणार अशी स्थिती पाहायला मिळत आहे. भाजपचे प्रमुख नेते जिथे जिथे जातील तिथे त्यांना जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान, महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज जाहीर माफी मागितली. ‘माझ्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर माफी मागतो’, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.