देशभरात 78 वा स्वातंत्र्यदिवस मोठ्या उत्साहास साजरा होत आहे. याच दिवसाचे अवचित्त साधत प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या हंगामाच्या लिलावाचे मुंबईत आयोजन करण्यात आले आहे. या लिलावापूर्वी स्टार खेळाडू परदिप नरवाल आणि मनिंदर सिंग यांनी डिस्ने स्टार आणि युवा अनस्टॉपेबलने पाठिंबा दिलेल्या मुंबई पब्लिक स्कूलला भेट दिली आणि ध्वजारोहण समारंभाला हजेरी लावली. यावेळी दोन्ही खेळाडूंनी शाळकरी मुलांना कबड्डीचे धडेही दिले आणि अनेक भेटवस्तूही भेट दिल्या.
कबड्डी हा देशाच्या संस्कृतीचा एक भाग असून स्वातंत्र्यपूर्व काळापासून हा खेळ प्रचलित आहे. आज मोठ्या संख्येने तरुण या खेळाकडे वळल्याचे पासून आनंद होतो, असे परदिप नरवाल म्हणाला. तसेच ध्वजारोहण समारंभात भाग घेता आला याबद्दल आनंद व्यक्त करत त्याने देशवासियांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छाही दिल्या.
देशाच्या कानाकोपऱ्यात कबड्डी हा खेळ खेळला जातो. याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा अशीच कायम राहील ही खात्री आहे. हा खेळ देशवासियांच्या रक्तात भिनलेला असून त्यामुळेच आम्हाला प्रेम आणि पाठिंबा मिळतो. यामुळे आम्हालाही प्रेरणा मिळते, असे मनिंदर सिंग म्हणाला. कबड्डी खेळाचा सर्वांगीण विकास घडवून आणल्याबद्दल त्याने प्रो कबड्डी लीगच्या संयोजकांचे आभार मानले आणि देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.