
जमिनीवरून रखरखीत, लालभडक दिसणाऱया सूर्याची आतापर्यंत न उलगडलेली बरीच गुपिते नासाच्या ‘पारकर सोलर प्रोब’ मिशनमुळे उघड होत आहेत. सूर्याच्या जवळ पोहोचण्यात इतर यानांच्या तुलनेत आघाडी मिळवलेल्या ‘पारकर सोलर प्रोब’ यानाने सूर्य इतका का तापतो, याचे अंतराळ संशोधकांना दिले आहे. सूर्यावरील वातावरण हे त्याच्या पृष्ठभागापेक्षा 100 पटीने अधिक गरम असल्याचा निष्कर्ष यानाने काढला आहे.
इतर यानांच्या तुलनेत ‘पारकर सोलर प्रोब’ यान सूर्यापासून जवळपास 70 लाख किलोमीटर इतक्या जवळच्या अंतरावर गेले आहे. तेथून या यानाने सौर वायू आणि अंतराळातील हवामानाची रहस्ये उलगडली आहेत. यासंदर्भातील संशोधकांनाही थक्क करणारे निष्कर्ष ‘नेचर’ जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. सूर्याविषयी अनुत्तरीत राहिलेल्या प्रश्नांची उत्तरे यातून शोधणे सोपे पडणार आहे. सूर्याच्या वातावरणाबाबत आधी उलगडा होऊ न शकलेल्या भागांत हे यान 24 कक्षांमध्ये फिरेल असे उद्दिष्ट आहे. यानाने त्यापैकी तीन कक्षा पूर्ण करून माहिती पाठवली आहे.
‘नासा’ची महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम
‘नासा’ने पारकर सोलर प्रोब हे यान गेल्या वर्षी 12 ऑगस्ट 2018 रोजी अंतराळात पाठवले होते. वास्तविक हे यान 2015 सालामध्येच पाठवले जाणार होते, परंतु यानाचा मुहूर्त पुढील तीन वर्षे रेंगाळला. यानाचे नाव यूजीन युमैन पार्कर या संशोधकाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. ‘नासा’ची ही आजपर्यंतची महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम मानली गेली आहे. सूर्याच्या बाह्यभागातील वातावरण आणि सौर वायूचे रहस्य उलगडण्यासाठी ‘नासा’ने ही मोहीम यशस्वी करण्याचा चंग बांधला आहे.




























































