पारनेर – खड्डय़ात आदळल्यानंतर कार झाडाला धडकून तरुणाचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रस्त्यावरील खड्डय़ात आदळल्यानंतर चालकाचा ताबा सुटल्याने कार झाडावर धडकून युवकाचा मृत्यू झाल्याची घटना पारनेर- सुपे रस्त्यावर रविवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. शुभम अनिल इथापे (वय -22, रा. पारनेर) असे मृताचे नाव आहे.

शुभम हा मोटारीने सुपे येथे निघाला होता. पारनेर-सुपे रस्त्यावर हंगा तलावाकडे जाणारा रस्ता ओलांडून मोटार पुढे निघाली असता रस्त्यावरील खड्डय़ामध्ये मोटार आदळून शुभमचे नियंत्रण सुटून कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. यात शुभम गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेतच शुभम मोटारीत अडकून पडला होता.

अंधार असल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱया वाहनचालकांच्या लक्षात ही बाब आली नाही. पहाटे सहा वाजता हंगा येथील तरुणांच्या हा अपघात असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ 108 रुग्णवाहिकेशी संपर्क करून त्यास नगर येथे उपचारासाठी पाठविले.

नगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रकृती गंभीर असल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. मात्र, तेथही उपचार होऊ शकले नाहीत. काही वेळानंतर शुभमचा मृत्यू झाला. नगर येथे शुभम याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर दुपारी तीन वाजता पारनेर येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.