
सामना प्रतिनिधी । उरण
मावळ लोकसभेचे पवारांच्या चौथ्या पीढीतील उमेदवार पार्थ पवार प्रचारा दरम्यान अनेक प्रकारच्या करीत असलेल्या नौटंकीमुळे नेटकर्यांकडून ट्रोल होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. तर रायगडातील राष्ट्रवादीचे उमेदवार सुनिल तटकरे यांच्यामागील 70 हजार कोटी सिंचन घोटाळ्याच्या आरोपाच्या लचांटामुळे विविध प्रचार सभांमध्ये या एकमेव मुद्यावरून लक्ष केले जात आहे. त्यामुळे मावळमध्ये पार्थ तर रायगडात तटकरे यांची प्रचार फेर्यात डोकेदुखी वाढतच चालली आहे.
मावळ मतदार संघातून शरद पवार यांची चौथी पीढी निवडणूकीच्या रिंगणात उतरली आहे. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया पवार, रोहित पवार पाठोपाठ अजित पवार पुत्र पार्थ पवार निवडणूक लढविण्यास सज्ज झाले आहेत. उमेदवारी जाहीर होण्याआधीपासूनच पार्थ यांच्या विशेषता उरण-पनवेलमध्ये काही कार्यक्रमांच्या निमित्ताखाली गाठीभेटींचे सत्र सुरु झाले होते. मात्र त्याचवेळी घराणेशाहीची ओरड होऊ लागल्याने मावळमध्ये पवार घराण्यातला कोणताही उमेदवार निवडणूक लढविणार नसल्याचे तसेच लोकसभेचीही निवडणूक लढविणार नसल्याचे दस्तुरखुद्द शरद पवार यांनी जाहीर केले होते. मात्र माढातून लोकाग्रहाची टिमकी वाजवित शरद पवारांनी निवडणूक लढविण्याचे जाहीर केले. त्यानंतर घरगुती कलहातून मावळसाठी पार्थची उमेदवारी जाहीर करावी लागल्यानंतर शरद पवार यांनी माढातून माघार घेतली. तेव्हापासून राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीमध्ये काही एक अलबेल नसल्याची वाच्यता उघडपणे केली जाऊ लागली आहे. त्यानंतर मावळ मतदार संघात पार्थ यांनी प्रचारा दरम्यान प्रचारापेक्षा त्यांनी चालविलेल्या नौटंकीच्या चर्चाच अधिक रंगल्या आहेत.
पहिल्यांदाच अडखळत केलेल्या भाषणावरुनच नेटकरी आणि विरोधकांनी पार्थला चांगलेच ट्रोल केले. कधी रेल्वेतून प्रवास,तर कधी प्रचारा दरम्यान धावाधाव करीत असल्याच्या अनेक प्रकारावरून पार्थ नेटकर्यांकडून सातत्याने ट्रोल होत आहेत. आता दापोडी येथील विनियार्ड चर्चमधील फादर यांची भेट घेतल्याने पार्थ पुन्हा ट्रोल झाले आहेत. अंधश्रध्दा परविणार्या फादरकडून फादर आणि पार्थ यांनी आपापल्या शक्तींची अदलाबदल केल्याच्या चर्चेनंतर तर नेटकर्यांनी पार्थ यांची संभावना महाराष्ट्राचा पप्पू म्हणून केली आहे. प्रचारात सुरु असलेली पार्थची नौटंकी, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील होत असलेले सिंचन घोटाळ्यातील गंभीर आरोप आणि नेटकर्यांकडून ट्रोल होण्याच्या वाढत्या प्रकारामुळे मात्र मावळ मतदारसंघातील त्यांची डोकेदुखी चांगलीच वाढत चालली आहे.
रायगडमधील राष्ट्रवादीचे आणखी एक उमेदवार सुनिल तटकरे 70 हजार कोटी सिंचन घोटाळ्याच्या आरोपाचे भूत त्यांच्या चांगलेच मानगुटीवर बसले आहे. अधुनमधून या सिंचन घोटाळ्याच्या आरोपाखाली विरोधकांकडून त्यांची खिल्ली उडवित आहेत. तर सत्ताधार्यांकडून अजित पवार आणि सुनिल तटकरे यांच्या सिंचन घोटाळा आरोप प्रकरणाचा निकाल कोणत्याही क्षणी येणार असा दावा महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर भाषणातून केला आहे. विरोधकांच्या राष्ट्रवादी उमेदवारांच्या घोटाळ्याविरोधात रान उठविल्याने उमेदवारांना त्यांना प्रतिउत्तर देणं चांगलंच अवघड होऊन बसले आहे. त्यातच तटकरेंविरोधात रायगड कॉग्रेंसमध्ये प्रचंड प्रमाणात नाराजी आहे. कॉग्रेंस कार्यकत्यांनी तटकरेंविरोधात आणि त्यांनी चालविलेल्या घराणेंशाही विरोधात नाराजींचा सुर आता उघडपणे लावण्यास सुरुवात केली आहे. रायगड कॉग्रेंसला खच्चीकरण करण्यात तटकरेंचा सिंहाचा वाटा असल्याने त्यांचा प्रचार करण्यास काही तालुक्यातील कार्यकर्त्यांनी जाहीरपणे नकार दर्शविला आहे. शेकापनेही सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर श्वेतपत्रिका काढून तटकरेंच्या नावाने शिमगा केला होता.त्यामुळे शेकाप आणि राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांमध्ये असलेला ताणतणाव अद्याप दूर झालेला नाही. त्यामुळे तटकरेंच्या अडचणी आणखीनच वाढत चालल्या आहेत.
























































