गौतम बुद्धांचा उल्लेख करत रामदास आठवलेंची ‘पठाण’ चित्रपटाच्या वादात उडी, म्हणाले….

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेता शाहरूख खान आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांच्या बहुचर्चित ‘पठाण’ (Pathaan movie) या चित्रपटाच्या गाण्यावरून सध्या नवा वाद सुरू झाला आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ (Besharam Rang song) हे गाणे गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाले. या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकीनी घातली आहे. भगव्या रंगाची बिकीनी आणि बेशरम रंग हे बोल यामुळे या गाण्याला विरोध होत आहे. आता या वादात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही उडी घेतली आहे.

पुण्यात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रामदास आठवले यांनी गाण्यातील ‘बेशरम’ या शब्दावर आक्षेप घेतला आहे. आठवले म्हणाले की, या चित्रपटाला आमचा विरोधत नाही. परंतु गौतम बुद्ध देखील भगवा रंग परिधान करायचे. भगवा रंग जसा भाजप, शिवसेनेचा आहे, तसाच तो आमचाही आहे. मात्र गाण्यातील ‘बेशरम’ शब्द काढला पाहिजे. कोणताही रंग बेशरम नसतो. हा शब्द काढला नाही तर आम्ही देखील आंदोलन करू.

काय आहे गाणं?

शाहरूख आणि दीपिकाचं ‘बेशरम रंग’ हे गाणं नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात शाहरुख आणि दीपिकाचा रोमान्स दाखवण्यात आला आहे. या गाण्यातील दीपिकाच्या आऊटफीटमुळे तिला ट्रोल करत तिच्यावर टीका केली जात आहे. तसेच गाण्याचे बोल आणि भगवा रंग यामुळे याचा विरोधही होत आहे.

मंत्र्यांची धमकी

‘पठाण’ (Pathaan) या चित्रपटात अनेक चुका असून हा चित्रपट विखारी मानसिकतेवर आधारित आहे. ‘बेशरम रंग’ या गाण्याचे बोल आणि दीपिका पदुकोण हिने घातलेली भगव्या रंगाची बिकीनी बदलण्याची गरज आहे, अन्यथा मध्य प्रदेशमध्ये आम्ही या चित्रपटाचा एकही शो लागू देणार नाही, अशी धमकी गृहमंत्री नरोत्तमदास मिश्रा यांनी दिली आहे.

गुन्हा दाखल करण्याची मागणी

मुजफ्फरपूर येथील वकील सुधीर ओझा यांनी शाहरुख खान, दीपिका पदुकोण, आदित्य चोप्रा, जॉन इब्राहिम आणि सिद्धार्थ आनंद यांच्या विरोधात स्थानिक न्यायालयात याचिका दाखल केली असून हिंदू समाजातील लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत त्यांनी एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.