
सामना प्रतिनिधी । बीड
आजारी असल्याचा बहाणा करून डॉक्टरकडे तपासणीसाठी आलेल्या रुग्णाने डॉक्टरला ८ लाखांना गंडा घातला आहे. डॉक्टरकडे तपासणीसाठी आलेल्या बोगस रुग्णाने डॉक्टरच्या टेबलच्या ड्रॉव्हरमधून ८ लाखांची रक्कम घेऊन घेऊन पोबारा केला. बीड शहरात ही घटना घडली.
डॉ. चंद्रकांत नवनाथ नेवडे यांचा बीड शहरात जालना रोडवर ‘कृष्णाई’ नावाचा दवाखाना आहे. डॉ. नेवडे दवाखान्यात असताना त्यांच्या वडिलांनी बी-बियाणे आणि दवाखान्याचे उपकरणे खरेदीसाठी ८ लाख रुपये त्यांच्याजवळ आणून दिले. सदरील रक्कम डॉ. नेवडे यांनी एका पिशवीत घालून स्वतःच्या केबिनमधील टेबलच्या ड्राव्हरमध्ये ठेवली. दरम्यान ३.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्याकडे श्रीनिवास नावाचा रुग्ण आला. केबिनमध्ये आल्यानंतर त्याने पोट दुखत असल्याचे डॉ. नेवडे यांना सांगितले. त्याची तपासणी करण्याच्या उद्देशाने हातमोजे आणण्यासाठी डॉ. नेवडे शेजारच्या खोलीत गेले. हातमोजे घेऊन केबिनमध्ये परत आल्यानंतर श्रीनिवास तेथून गायब झाला होता. संशय आल्यानंतर डॉ. नेवडे यांनी ड्रॉव्हर उघडून पहिले असता त्यांना आठ लाख रुपये ठेवलेली पिशवी लंपास झाल्याचे दिसून आले. सदरील रक्कम श्रीनिवास यानेच लंपास केल्याची तक्रार त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल केली. डॉ. नेवडे यांच्या तक्रारीवरून श्रीनिवास याच्यावर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.





























































