
घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवरील पुलावरून भरधाव वाहने चालवल्यास पालिकेकडून रोख दंड वसूल केला जाणार आहे. यासाठी पालिका खास स्वयंचलित यंत्रणा बसवणार आहे. या ठिकाणी वाढलेले अपघात रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
घाटकोपरवरून वाशी, नवी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांसाठी घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड बनवण्यात आला आहे. पूर्व उपनगरात घाटकोपर, विक्रोळी, चेंबूर परिसरात होणारी वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वाचा असलेल्या या मार्गावरच वाहतूककोंडी होऊ लागली. त्यावर उपाय म्हणून या मार्गावर उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. अनेक वर्षांपासून रखडलेला हा पूल मागील वर्षी खुला करण्यात आला असून त्यास 500 कोटींहून अधिक खर्च आला आहे. दरम्यान, घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड हा शीव-पनवेल महामार्ग आणि पूर्व द्रुतगती मार्गांना जोडणारा मुख्य रस्ता आहे. या पुलामुळे पूर्व द्रुतगती मार्ग, सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता आणि पूर्व मुक्त मार्गावरून येणाऱ्या वाहनांमुळे होणारी वाहतूककोंडी फोडण्यास मदत होणार आहे.
वाहतूक पोलीस दंड वसूल करणार
हा पूल वाहतुकीसाठी सुरू झाल्यानंतर अपघात वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. उड्डाणपुलावर बसविण्यात येणाऱ्या कॅमेऱ्यांमुळे वाहनांचा वेग नोंद होणार असून वेगमर्यादा पार केल्यास वाहतूक पोलिसांकडून दंड होणार आहे. यासाठी 50 लाख रुपये खर्च करून ‘स्पीड व्हायलोशन डिटेक्शन सिस्टम’ बसविण्यात येणार आहे.
उड्डाणपुलाची वैशिष्टय़े
महानगरपालिकेकडून सुमारे तीन किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल बांधण्यात आला आहे. हा उड्डाणपूल शिवाजी नगर, बैंगनवाडी, देवनार क्षेपणभूमी व मोहिते पाटील-नगर हे चार महत्त्वाचे जंक्शन आणि देवनार नाला, चिल्ड्रेन एड नाला, पीएमजीपी नाला अशा तीन मोठय़ा नाल्यांवरून जातो. पुलाची एकूण लांबी 2.991 किलोमीटर तर रुंदी 24.2 मीटर इतकी आहे. उत्तर वाहिनी 3 व दक्षिण वाहिनी 3 अशा एकूण 6 मार्गिका या पुलावर आहेत.



























































