पारनेरमध्ये चोरी केल्याप्रकरणी एकाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। पारनेर

भगवानबाबांच्या मूर्तीच्या रचनेचा भाग जाळणे तसेच मूर्ती तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची चोरी केल्याप्रकरणी स्वप्नील शिंदे याच्या विरोधात पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास पारनेर पोलिसांनी अटकही केली आहे.

यासंदर्भात नगर येथील प्रसिद्ध चित्रकार व शिल्पकार प्रमोद दत्तात्रय कांबळे रा. कलाश्री, गुलमोहर रोड यांनी फिर्याद दिली आहे. गेल्या सप्टेबर महिन्यात बीड जिल्हयातील सावरगांव ता. पाटोदा येथून 25 फुट उंचीच्या भगवानबाबा यांच्या मूर्तीचे काम कांबळे यांना मिळाले होते. त्यांच्या स्टुडीओमध्ये जागा नसल्याने त्यांचा मुलगा शुभंकर याने त्याचा मित्र निखिल सुरेश शिंदे यांच्या भाळवणी येथील आरती प्लॅस्टिक या कारखान्यातील जागा दाखविली. या जागेत पुतळा उभारणीचे काम करणे शक्य असल्याने जागेचे भाडे किती द्यायचे यासंदर्भात कांबळे यांनी विचारणा केली असता भाडयाची आवश्यकता नाही. जे काही विजेचे बिल येईल त्यापैकी निम्मे बिल कांबळे यांनी द्यावे असे ठरले होते. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यापासून तेथे मूर्ती तयार करण्याचे काम सुरू झाले. काही दिवसानंतर मूर्तीच्या मागील भागात सुधारणा करणे आवश्यक वाटल्याने कांबळे यांनी ते काम सुरू केले.

या कालावधीतील विजेचे बिल रूपये 1 लाख 16 हजार रूपये निखिल याचा मोठा भाउ स्वप्निल याच्याकडे कांबळे यांनी सुपूर्द केले. प्लॅस्टिक बंदीमुळे कारखान्यास सिल लावले गेले त्या कालावधीमध्ये डिसेंबर महिन्याचे अखेरीस स्वप्निल शिंदे याने कांबळे यांच्याकडे पुन्हा दिड लाख रूपयांची मागणी केली. काम पूर्ण झाल्यावर पैसे देतो असे कांबळे यांनी सांगितल्यानंतर शिंदे याने काम करू नका असे सांगत कांबळे यांची अडवणूक केली. त्यामुळे कांबळे यांनी त्यास दि. 6 जानेवारी रोजी दिड लाख रूपये दिले. दि. 7 जानेवारी रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास स्वतः कांबळे यांच्यासह कारागिर जितेश पांडे, प्रितम पवार, बाळकृष्ण विसपुते तसेच इतर लोक शिंदे यांच्या आरती प्लॅस्टिक या कारखान्यात गेले असता कलाकृतीच्या पाठीचा भाग तोडला असल्याचे दिसून आले. तसेच तेथे असलेले 12 हजार रूपये किमतीचे वेल्डींग मशिन, 1 हजार 500 रूपयांचे हॅन्ड ग्राईंडर, 1 हजार 600 रूपयांचे ड्रिल मशिन, 1 हजार 800 रूपयांचे उडकटर असे एकूण 16 हजार 900 रूपयांचे साहित्यही आढळून आले नाही.

कांबळे यांनी स्वप्निल शिंदे याच्याशी संपर्क केला असता आपण तिकडे आलो नाही, त्याबाबत आपणास काहीही माहीती नाही असे उत्तर देण्यात आले. मात्र हे साहित्य शिंदे यानेच चोरून नेल्याचे कांबळे यांचे म्हणणे आहे. कांबळे यांनी शेजारी राहणारे लक्ष्मण रोहोकले यांच्याकडे विचारणा केली असता कारखान्याच्या मागील बाजून स्वप्निल शिंदे यांने कलाकृती जाळल्याचे सांगण्यात आल्याचेही कांबळे यांचे म्हणणे आहे. भगवान बाबांच्या मूर्तीच्या पाठीमागील बाजूची रचना जाळून 5 लाख रूपयांचे नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी गेल्या 9 जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचे रविवारी पडसाद उमटू लागले होते. त्यानंतर पारनेर पोलिसांनी स्वप्निल शिंदे यास तातडीने अटक केली.