शेतकऱ्याची गोळ्या झाडून हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । उत्तर प्रदेश

पालीमुकीमपुरा येथील दीनापुर गावातील एका शेतकऱ्याची मंगळवारी रात्री १२ च्या सुमारास गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. सुखवीर असे त्याचे नाव आहे. १२ वर्षापूर्वी या शेतकऱ्याच्या भावाचीही हत्या करण्यात आली होती. त्या हत्येशी संबंधित आरोपींनीच सुखवीरची हत्या केल्याचा आरोप त्याच्या घरातल्यांनी केला आहे. दरम्यान याप्रकरणी सहाजणांविरोधात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे.

दीनपुरात राहणारा सुखवीर हा मंगळवारी रात्री १२ च्या सुमारास घराच्या छतावर झोपण्यास गेला होता. त्याचवेळी एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर गोळी झाडली. गोळीच्या आवाजाने सुखवीरचे नातेवाईक छताच्या दिशेने धावले. मात्र तोपर्यंत सुखवीरचा मृत्यू झाला होता. हे पाहून त्याच्या घरच्यांना धक्काच बसला व त्यांनी याबद्दल तात्काळ पोलिसांत तक्रार नोंदवली.

२००६ मध्ये सुखवीर सिंहचा भाऊ सूरजपाल याची हत्या करण्यात आली होती. गावातीलच राम अवतार शास्त्री हा या हत्येचा आरोपी आहे असं सुखवीरच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. सुखवीर हा त्याच्या भावाच्या हत्येचा साक्षीदार असून तो या बाबत युक्तीवाद करत होता. सुखवीरच्या नातेवाईकांच्या अनुसार सूरजपालच्या हत्येचा आरोपी खूप काळापासून जामिनावर बाहेरच फिरत आहे. या हत्येप्रकरणी त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी असं सुखवीरच्या घरातल्यांनी सांगितलं आहे.