पाकिस्तानी सैन्यानेच घडवून आणले पेशावर मशिदीत स्फोट, माजी लष्करी अधिकाऱ्याच्या दाव्यामुळे खळबळ

पाकिस्तानातील पेशावरमध्ये सोमवारी एक महाभयंकर स्फोट झाला होता. या स्फोटात आतापर्यंत 101 जणांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी काही जणांना अटक केल्याचे सांगितले आहे. एकीकडे या स्फोटामागे कोण आहे हे शोधण्याचा पोलिसांना प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे मेजर पदावरून निवृत्त झालेले पाकिस्तानचे माजी लष्करी अधिकारी आदिल रझा यांनी दावा केला आहे की पाकिस्तानी सैन्यानेच हा स्फोट घडवून आणला आहे. आदिल रझा हे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे समर्थक आहेत.

रझा यांचे म्हणणे आहे की अशा पद्धतीने हल्ले घडवून पाकिस्तानी लष्कर निवडणुका पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. रझा यांनी म्हटलंय की त्यांना त्यांच्या सैन्यातील सूत्रांनी ही माहिती दिली आहे की आम्हाला जी पद्धत सांगितली आहे तीच आम्ही पेशावरमध्ये वापरली आहे. रझा म्हणाले की सैन्याच्या प्रशिक्षणादरम्यान अशा पद्धतीच्या कारवाया घडवून आपल्याला हवे ते काम करवून कसे घ्यायचे हे शिकवलं जातं, मात्र या कारवाया आपल्या देशात नाही तर शत्रू राष्ट्रांमध्ये करायच्या असतात. इथे सैन्याने या कारवाया आपल्याच देशात करायला सुरुवात केली आहे.

पाकिस्तानातील पेशावरमध्ये सोमवारी पोलीस मुख्यालयातील मशिदीमध्ये आत्मघाती हल्ला करण्यात आला होता. ज्या भागात हा स्फोट घडवून आणण्यात आला तो अत्यंत सुरक्षित मानला जातो. ज्यावेळी हा हल्ला करण्यात आला तेव्हा मशिदीमध्ये 300-400 पोलीस कर्मचारी नमाज पढत होते. हल्लेखोर देखील मशिदीतच होता. त्याने स्फोट घडवल्यानंतर मशिदीच्या भिंती आणि छत कोसळले होते, ज्याखाली अनेकजण दबले होते. या स्फोटात आतापर्यंत 101 जणांचा मृत्यू झाला असून 59 जणांवर उपचार सुरू आहेत.