कोल्हापूर शहरातील रस्त्यांची दुरवस्था; महापालिकेविरोधात जनहित याचिका

दर्जाहीन कामामुळे शहरातील रस्ते खड्डेमय बनले असून, रस्त्यांची परिस्थिती भीषण आहे. रस्त्यांमुळे अपघात होऊन अनेकांचा जीव गेला असून, वाहनचालकांना मणक्याचे आणि कंबरेचे दुखणे उद्भवत आहे. गेल्या वर्षी केलेले रस्तेही उखडले आहेत. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेच्या बेफिकीर कारभाराविरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल केली आहे, अशी माहिती उदय नारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. ज्येष्ठ कायदेतज्ञ असीम सरोदे न्यायालयात बाजू मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते उदय नारकर, डॉ. रसिया पडळकर, डॉ. अनिल माने, प्रा. डॉ. तेजस्विनी देसाई, ऍड. सुनीता जाधव आणि भारती पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जनहित याचिका दाखल केली आहे. यासाठी शहरातील 77 रस्त्यांचा सर्व्हे केला असून, या रस्त्यांच्या समस्या समजून घेतल्या आहेत. यावेळी ऍड. असीम सरोदे यांनी शहरातील रस्त्यांच्या समस्यांचा पाढाच वाचला.

गेली अनेक वर्षे कोल्हापुरातील रस्ते खराब असून, त्याकडे महापालिका दुर्लक्ष करीत आहे. कुठेही कोणत्याही पद्धतीने रस्ते उकरायचे, दर्जाहीन पॅचवर्क, ‘टक्केवारी’ आणि भ्रष्टाचार यांमुळे शहरातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. गेल्या वर्षी केलेले रस्तेसुद्धा अत्यंत दर्जाहीन आहेत. रस्त्यांचा अयोग्य ढाळ, फुटपाथवरील अतिक्रमण्sै, रस्त्यांची वाढलेली उंची याबद्दलही अनेक तक्रारी आहेत. कोल्हापूर महापालिकेने नागरिकांच्या जीवाशी चालविलेला खेळ थांबविण्यासाठी थेट न्यायालयात दाद मागणार असल्याचे नारकर यांनी सांगितले.