
देवगड तालुक्यातील इतिहास संशोधन मंडळ हे सातत्याने इतिहास शोधून काढण्यासाठी प्रयत्नशिल असते. आजवर अनेक मंदिरे व दुर्मिळ मूर्ती यांच्या वैशिष्ठ्यांचा शोध या इतिहास संशोधन मंडळाने घेतला आहे. या बरोबरच गेल्या दोन वर्षात देवगड तालुक्यातील पंधरा ते वीस गावात शंभरच्या जवळपास नविन कातळचित्रांचा शोध घेऊन त्यांचे दस्तऐवजीकरण करण्यात संशोधन मंडळाने यश मिळवले आहे.
साळशी येथील नैसर्गिक व्हाळा लगतच एक प्राचीन पुष्करणी आहे. या भागात सिमेंट काँक्रीटचा बंधारा घालून धरण बांधण्यात आले. तेव्हा या भागातील वाढलेले जंगल तोडून साफसफाई करण्यात आली. धरणालगतच एक दहा-पंधरा फुट उंचीची मोठी धोंड असून या दगडावर काहीतरी लिपी कोरलेली आहे असे वाटल्याने साळशी येथील मुकुंदकाका भटसाळस्कर यांनी इतिहास संशोधन मंडळाच्या योगेश धुपकर यांच्या कानावर ही गोष्ट घातली. कोणता तरी शिलालेख सापडलाय हे कळताच त्यांनी तातडीने साळशी मोहीम आयोजित केली. यावेळी इतिहास संशोधन मंडळाच्या संशोधकांना दोन पेट्रोग्लिफ्स म्हणजेच कातळचित्रे सापडली आहेत. इथे या नैसर्गिक दगडावर एका बाजूला दगड तासून सपाट केला आहे. त्यावर दोन प्राणी कोरलेले आहेत.
साळशी इथल्या या कातळचित्राविषयी अधिक माहिती सांगताना पुरातत्व अभ्यासक रणजित हिर्लेकर म्हणाले, आतापर्यंत गेल्या काही वर्षांमधे रत्नागिरीपासून कुडाळ -वेंगुर्ल्यापर्यंत दीड हजारहुन अधिक कातळचित्रे अनेक संशोधकांच्या व हौशी अभ्यासकांच्या प्रयत्नातून शोधून काढण्यात आली आहेत. ही सर्वच कातळचित्रे जमिनीलगत सपाट कातळावर कोरलेली आहेत. जमीनीलगत सपाट कातळावर कोरलेली कातळचित्रे हे कोकणचे वैशिष्ठ्य आहे. अफगाणिस्थान, गांधार, काश्मीर या भागातील जी कातळचित्रे आढऴतात ती उभ्या दगडांवर कोरलेली आढळतात. अशी उभ्या दगडांवरील कातळचित्रे अपवाद वगळता कोकणात आजवर कुठेही आढळलेली नाहीत. साळशी येथील उभ्या दगडावरील ही अशी दोन कातळचित्रे कोकणातील प्रथमच सापडली आहेत. त्यामुळेच साळशी येथील ही कातळचित्रे विशेष म्हणावी लागतील.
या कातळचित्रांचा शोध घेण्याच्या या मोहीमेत रणजित हिर्लेकर यांच्या सोबत योगेश धुपकर व अजित टाककर हे सहभागी होते. अशा रितीने देवगड तालुक्यातील कातळचित्रांच्या यादीत एक वेगळ्या वैशिष्ठ्यपुर्ण कातळचित्राची भर पडली आहे.